‘टीम इंडिया’वर दुखापतीची संक्रांत; आता बुमराह, मयांक, अश्विनही जायबंदी

ऑस्ट्रेलिया दौऱयावर असलेल्या ‘टीम इंडिया’वर यंदा दुखापतीची संक्रांत दिसतेय. कारण दौरा सुरू होण्यापूर्वी सुरू झालेल्या दुखापतीच्या ग्रहणाने हिंदुस्थानची पाठ सोडलेली नाहीये. रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी यांच्यानंतर प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराही दुखापतीमुळे चौथ्या कसोटीस मुकणार आहे. शिवाय मयांक अग्रवाललाही सरावादरम्यान दुखापत झाल्याने ‘टीम इंडिया’चा पाय आणखी खोलात गेला आहे. तिसऱया कसोटीत प्राणाची बाजी लावून फलंदाजी केलेल्या रविचंद्रन अश्विनच्या कमरेचे दुखणे आणखी वाढल्याने ‘टीम इंडिया’च्या गोटातील चिंता वाढली आहे. त्यामुळे रोमहर्षक वळणावर असलेल्या कसोटी मालिकेत बाजी कशी मारायची असा मोठा प्रश्न अजिंक्य रहाणेच्या सेनेपुढे निर्माण झाला आहे. तसेच जसप्रीत बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे ब्रिस्बेन कसोटीत टीम इंडियाची मदार ही मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी. नटराजन व शार्दुल ठाकूर या युवा खेळाडूंच्या खांद्यावर असणार आहे.

ब्रिस्बेन कसोटीसाठी असा असू शकतो हिंदुस्थानी संघ

शुभमन गिल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, मयांक अग्रवाल/पृथ्वी शॉ, रविचंद्रन अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.

आतापर्यंत 9 खेळाडूंना दुखापत

चौथी कसोटी सुरू होण्यापूर्वी हिंदुस्थानच्या 9 क्रिकेटपटूंना दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वी अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला दुखापत झाली. त्यानंतर पहिल्या कसोटीत मोहम्मद शमी जायबंदी झाला. दुसऱया कसोटीत उमेश यादवच्या मांडीचा स्नायू दुखावला गेला, तर सरावादरम्यान लोकेश राहुलच्या बोटाला दुखापत झाली. तिसऱया कसोटीत रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी व रविचंद्रन अश्विन यांना दुखापत झाली. आता जसप्रीत बुमराह व मयांक अग्रवाल यांनाही दुखापत झाल्याने हिंदुस्थानी संघाकडे फारसे पर्यायी खेळाडूही उरलेले नाहीत.

नटराजन, पृथ्वी, शार्दुल, सुंदर, कुलदीप प्रतीक्षेत

रवींद्र जाडेजा व हनुमा विहारी चौथ्या कसोटीत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अश्विन, बुमराह व मयांक यांचेही अखेरच्या कसोटीत खेळणे अजून तळ्यात-मळ्यात आहे. त्यामुळे टी. नटराजन, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर व कुलदीप यादव यांच्यापैकी कोणाला चौथ्या कसोटीत घ्यायचे यासाठी संघ व्यवस्थापनाची ‘कसोटी’ लागणार आहे. अश्विन फिट झाला नाही तर वॉशिंग्टन सुंदरला त्याच्या जागेवर संधी मिळू शकते. मयांक खेळू शकला नाही, तर पृथ्वी शॉलाही ब्रिस्बेन कसोटीत संधी मिळणार आहे. रवींद्र जाडेजाच्या जागेवर कुलदीपच्या नावाचा विचार होऊ शकतो. जसप्रीत बुमराह फिट नसेल तर त्याच्या जागेवर टी. नटराजनऐवजी शार्दुल ठाकूरचे पारडे जड वाटत आहे.

बंगळुरूतील अॅपॅडमी काय करते? हॉस्पिटल वॉर्ड तयार झालाय

कोरोनामुळे मार्च ते सप्टेंबर या कालावधीत क्रिकेट स्पर्धा झाल्याच नाहीत. सप्टेंबर महिन्यापासून क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली, पण सप्टेंबर ते जानेवारी या पाच महिन्यांच्या कालावधीत हिंदुस्थानी क्रिकेटपटू एकामागोमाग एक असे जखमी होत आहेत. रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, लोकेश राहुल, रवींद्र जाडेजा, हनुमा विहारी, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह व मयांक अग्रवाल ही टीम इंडियाच्या जखमी खेळाडूंची यादी. टीम इंडियात हॉस्पिटल वॉर्ड तयार होत आहे. यामुळे बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अॅपॅडमीवर आता टीका केली जात आहे. या अॅपॅडमीद्वारे खेळाडूंवर योग्य ते उपचार केले जात नाहीत असा सूर यावेळी उमटू लागला आहे.

ब्रिस्बेन कसोटीपूर्वी होणार फिटनेस टेस्ट

क्षेत्ररक्षण करताना जसप्रीत बुमराहला एब्डोमिनल ट्रेनचा (कमरेचा किंवा ओटीपोटाचा) त्रास सुरू झाला आहे. शंभर टक्के फिट नसलेल्या या प्रमुख गोलंदाजाला चौथ्या कसोटीत खेळविण्याचा धोका पत्करण्यास ‘बीसीसीआय’ची तयारी नाही. दुसरीकडे नेटमध्ये सराव करताना मयांक अग्रवालच्याही हाताला दुखापत झाली आहे. शिवाय सिडनी कसोटीत साडेतीन तास फलंदाजी करणाऱया रविचंद्रन अश्विनची पाठदुखी आणखी बळावली आहे. बुमराह, अश्विनच्या दुखापतीमुळे हिंदुस्थानच्या अडणीत वाढ झाली आहे. त्यामुळे चौथ्या कसोटीपूर्वी या तिन्ही खेळाडूंची फिटनेस टेस्ट घेऊन मगच अंतिम 11 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली जाणार आहे. 15 जानेवारीपासून अखेरच्या चौथ्या कसोटी सामन्यास प्रारंभ होणार आहे.

टीम इंडिया रिस्क घेणार काय?

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या चार सामन्यांची कसोटी मालिका निर्णायक वळणावर असतानाच ‘टीम इंडिया’च्या महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे चौथ्या व अखेरच्या कसोटीत काही अनफिट खेळाडूंनाही खेळविण्याची रिस्क ‘टीम इंडिया’ घेऊ शकते. पंत पूर्णतः फिट नसल्याने त्याला केवळ फलंदाज म्हणून खेळविण्याचा निर्णय होऊ शकतो. जसप्रीत बुमराहसारखा खेळाडू मोक्याच्या वेळी संघात नसणे न परवडणारे आहे. त्यामुळे त्यालाही अखेरच्या कसोटीत खेळविण्याचा जुगार खेळला जाऊ शकतो. रविचंद्रन अश्विनच्या बाबतीत हिंदुस्थान धोका पत्करू शकते. कारण या प्रमुख फिरकी गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना आपल्या तालावर नाचविण्यात यश मिळविले असून फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे या अष्टपैलू खेळाडूच्या गैरहजेरीचा ‘टीम इंडिया’ला फटका बसू शकतो. यावेळी अनफिट खेळाडूंना खेळविण्याची रिस्क हिंदुस्थान घेणार काय? हे पाहणेही रंजक ठरणार आहे.

साहा, रिषभ दोघेही खेळू शकतात

टीम इंडियाचे व्यवस्थापन रिषभ पंत व रिद्धीमान साहा या दोन यष्टिरक्षकांनाही अंतिम अकरामध्ये संधी देऊ शकते. रिषभ पंतला फक्त फलंदाज म्हणून अंतिम संघात स्थान देऊन रिद्धीमान साहाला यष्टिरक्षक म्हणून खेळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या