विराट सेनेने घडवला इतिहास, 71 वर्षांत ऑस्ट्रेलियात पहिला मालिका विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । सिडनी

ऑस्ट्रेलियाच्या भूमिवर त्यांना कसोटी मालिकेत पराभूत करण्याचा भीम पराक्रम हिंदुस्थानच्या विराट सेनेने करून दाखवला आहे. 71 वर्षांत हे पहिल्यांदाच घडलं आहे. चौथी म्हणजेच सिडनी कसोटी पावसामुळे रद्द करण्यात आल्यानंतर टीम इंडियाने 2-1 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली आहे.

हिंदुस्थानचा 70 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा कसोटी मालिका विजय झाला. अॅडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून 2-1 अशा फरकाने पुढे असलेल्या टीम इंडियाने सिडनी कसोटीवरही पकड मजबूत केली होती. पण तिसऱ्या दिवसानंतर चौथ्या दिवशीही पाऊस व अंधुक प्रकाशाचा व्यत्यय आला आणि यजमान संघाने सुटकेचा निःश्वास टाकला. चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी 63 षटकांचा खेळ होऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांमध्ये गुंडाळणाऱ्या विराट कोहलीच्या ब्रिगेडने कांगारूंवर फॉलोऑन लादला. 1988 सालानंतर म्हणजेच 31 वर्षांनंतर त्यांच्यावर मायदेशात फॉलोऑनची नामुष्की ओढवली. अखेर त्यांनी दुसऱ्या डावात बिनबाद 6 धावा केल्या होत्या. त्यांचा संघ 316 धावांनी पिछाडीवर होता. टीम इंडियाला 3-1 अशा तगड्या विजयाची संधी होती. डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याने 99 धावा देत पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता. हिंदुस्थानला सिडनी जिंकण्यासाठी आज कांगारूंचे दहा फलंदाज बाद करावे लागणार होते. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला.

1955 सालानंतर

ऑस्ट्रेलियाने 6 बाद 236 या धावसंख्येवरून रविवारी पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे तब्बल चार तासांनंतर खेळ झाला. हिंदुस्थानने 80 मिनिटांमध्ये कांगारूंचा पहिला डाव गुंडाळला. कुलदीप यादवने निम्मा संघ गारद करताना नवा पराक्रम रचला. चायनामन गोलंदाजाने ऑस्ट्रेलियामध्ये त्यांचा निम्मा संघ गारद करण्याची ही 1955 सालानंतरची पहिलीच खेप ठरलीय. याआधी जॉनी वॉर्डले यांनी सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये 79 धावा देत कांगारूंचा निम्मा संघ गारद केला होता. पीटर हॅण्डस्कोम्बने 37, पॅट कमिन्सने 25, मिचेल स्टार्कने नाबाद 29 आणि जोश हेझलवूडने 21 धावा केल्या.

दृष्टिक्षेपात

हिंदुस्थानने आतापर्यंत चार वेळा ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादलाय. याआधी 1986 साली सिडनीत तर 1979 साली दिल्ली व मुंबईत हिंदुस्थानने कांगारूंना फॉलोऑन दिला होता.

याआधी इंग्लंडने 2005 साली ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादला होता. ट्रेंटब्रिज कसोटीत कांगारूंवर ही नामुष्की ओढवली होती. गेल्या 30 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियावर फक्त दोन वेळाच फॉलोऑन लादण्यात आला आहे.

हिंदुस्थानने पहिल्या डावात घेतलेली 322 धावांची आघाडी ही ऑस्ट्रेलियातील सर्वोत्तम ठरली आहे. हिंदुस्थानने मात्र मायदेशात 1998 साली कोलकात्यातील कसोटीत 400 धावांची आघाडी घेतली होती. ही त्यांची कांगारूंविरुद्धची सर्वोत्तम आघाडी होय.

राष्ट्रपतींनी टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा!