हिंदुस्थानसाठी आज करो या मरो; टीम इंडियासमोर मालिका वाचवण्याचे आव्हान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फोटो बीसीसीआयच्या ट्विटर हँडलवरून साभार

सामना ऑनलाईन,अॅडलेड

रोहित शर्माच्या धडाकेबाज शतकानंतरही सिडनी येथील पहिल्या वन डे लढतीत पराभूत झाल्यानंतर आता उद्या अॅडलेड येथे होणाऱ्या दुसऱ्या वन डे लढतीत हिंदुस्थानच्या क्रिकेट संघासमोर मालिका वाचवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये उद्या दुसरी वन डे लढत होणार असून यावेळी यजमान कांगारूंचा संघ विजयासह मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला असेल. विराट कोहलीच्या ब्रिगेडला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी उद्याच्या लढतीत विजय मिळवणे अत्यंत गरजेचे आहे.

…तर चौथा मालिका पराभव

हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियामध्ये 2007-08 सालानंतर एकही वन डे मालिका जिंकलेली नाही. यामध्ये द्विपक्षीय व तिरंगी मालिकांचा समावेश आहे. या दरम्यान तीन मालिकांमध्ये हिंदुस्थानला अपयशाचा सामना करावा लागलाय. आता पराभूत झाल्यास चौथ्या मालिका पराभव ठरेल.

सातत्याने खेळायला न मिळाल्यामुळे…

पहिल्या वन डेत अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नसल्यामुळे मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वरकुमार कमालीचा नाराज झाला आहे. दुसऱ्या वन डे लढतीच्या पूर्वसंध्येला तो म्हणाला, सातत्याने सामन्यांमध्ये खेळायला मिळाले नाही. ‘ब्रेक’ मिळाला. त्यामुळे गोलंदाजीतील ऱिहदमच बिघडलाय.

या खेळपट्टीत  दडलंय काय…

गेल्या दोन सामन्यांमध्ये येथे गोलंदाजांना मदत मिळालीय. कमीतकमी धावा फलकावर लागल्यात, मात्र सीमारेषानजीक असल्यामुळे चौकार-षटकारांची बरसात झाल्यास आश्चर्य वाटायला नको. तसेच उद्या पाऊस येण्याची शक्यताही नाहीए. त्यामुळे क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणीचा दिवस असणार आहे.

धोनीचा स्ट्राईकरेट चिंतेचा विषय, केदार जाधवला संधी?

हिंदुस्थानला सलामीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागलाय. आता उद्याच्या लढतीत विजय मिळवण्यासाठी हिंदुस्थानचा संघ जीवाचे रान करणार यात शंका नाही. संघामध्ये कोणता बदल करण्यात येतो हे पाहणेही रंजक ठरणार आहे. अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला दिनेश कार्तिकऐवजी संधी देण्यात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. महेंद्रसिंग धोनीचा फलंदाजी स्ट्राईकरेटही चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघात मिचेल मार्शची वर्णी लागण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

दृष्टिक्षेपात

हिंदुस्थानच्या दोन ते चार क्रमांकाच्या फलंदाजानी सिडनीतील वन डेत अवघ्या तीन धावा केल्या. हिंदुस्थानच्या क्रिकेट इतिहासातील हा दुसरा नीचांक ठरलाय.

महेंद्रसिंग धोनीने पहिल्या वन डेत 96 चेंडूंत 51 धावा केल्या. ही त्याची दुसरी संथ खेळी ठरलीय. याआधी 2017 साली वेस्ट इंडीजविरुद्ध त्याने 114 चेंडूंत 54 धावा केल्या होत्या.