
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पहाटेच्या सुमारास पुणे स्टेशन परिसरात एका रिक्षा चालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे . याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी दोन तासातच आरोपी रिक्षाचालकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. सागर मारुती मांढरे (वय.39,रा. कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
मुलगी आईच्या कुशीत झोपली असताना, रिक्षाचालकाने तिला उचलून रिक्षात ठेवले. त्यानंतर रिक्षा थेट सातारा रोड मार्केटयार्ड येथील एका पडीक इमारतीजवळ नेली. त्याठिकाणी सागरने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, झोपेतून जागे झाल्यानंतर मुलगी कुशीत नसल्याचे कुटूंबीयांना दिसले. त्यांनी सुरवातीला आजूबाजूला शोध घेतला. मात्र ती न सापडल्याने त्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनीही नुकत्याच घडलेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसर पिंजून काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढून त्याला अटक केली.
अपहरण झालेल्या मुलीच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दोन तासांमध्ये आरोपीचा माग काढून त्याला अटक करण्यात आली.
– यशवंत गवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बंडगार्डन पोलीस ठाणे






























































