‘त्या’ प्रकरणावरून आव्हाडांचा चित्रा वाघ यांना सवाल, ट्विटरवरून केलं आवाहन

‘हर हर महादेव’ चित्रपटाचा ठाण्यातला शो बंद पाडल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. शो बंद पाडल्यानंतर झालेली अटक आणि सुटका त्यानंतर एका महिलेने दाखल केलेल्या विनयभंगाच्या तक्रारीमुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे. या दोन प्रकरणांनी ते अडचणीत आले आणि त्यांना जामीनासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली. विरोधकांनी जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत टिकेची झोड उठवली आहे.

आव्हाड यांच्यावरील मारहाण प्रकरणातील आरोपाचा दाखला देत आव्हाडांना लक्ष्य करण्यात आलं. त्यामुळे आव्हाडांनी यावर खुलासा करणारं एक ट्वीट केलं असून त्यामध्ये अनंत करमुसे नावाच्या सोशल प्रोफाईलचे काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत.

आपल्यावर टिका करणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना उत्तर देताना त्यांनी स्क्रीन शॉट्स ट्विट केले आहेत. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी चित्रा वाघ यांना सवाल केला आहे की, ‘ज्या माणसाने 2016 ते 2020 माझा पाठलाग केला. ट्वीटर फेसबुक चा वापर करत बदनामी केली. ब्लॉक केल्यानंतरही दुसऱ्या मार्गाने तो मला त्रास देतच राहिला टीका करणाऱ्यांनो तुमच्या भावाच,तुमच्या वडिलांच,किंवा तुमच्या स्वतःच अशाप्रकारे नग्न छायाचित्र काढल गेलं असतं तर किंवा इतके वर्षे त्रास दिला गेला असता तर आपण काय केलं असतं? चित्राताई आपल्या नवऱ्याचं किंवा आपल्या नेत्यांच अर्धनग्न छायाचित्र जर प्रसारीत झालं असतं तर आपण काय केलं असतं? याचे उत्तर कधीतरी द्या.’

‘2016 ते 2020 त्याने काय केलं हे जरा कधीतरी बोलावून विचारा आणि मग टीका करा’, असं आवाहन देखील त्यांनी केलं.