महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांत ‘आयुर्वेद रथयात्रा’; घराघरांत आयुर्वेद पोहचवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन

आयुर्वेदाचार्य कै. प्र. ता. जोशी (नाना) धुळे, यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन महाराष्ट्र,यांच्या वतीने आयुर्वेद रथयात्रा काढण्यात येत आहे. महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांत ही रथयात्रा जाणार आहे. मोफत तपासणी शिबीर, औषधांचे वितरण, आयुर्वेदासंदर्भातील व्याख्याने असे विविध उपक्रम या निमित्ताने घेण्यात येणार असल्याची माहिती या रथयाञेचे संयोजक लातूर येथील श्रीराम आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालयाचे वैद्य दत्तात्रय दगडगावे यांनी दिली.

कोविड-19 च्या काळात राज्यातच नव्हे, तर देशातील प्रत्येक घरामध्ये नागरिकांनी आयुर्वेदाचा वापर केला आहे. आयुर्वेदिक काढा घराघरांतून घेण्यात आला. अनेकांना त्याचा लाभ झाला. ‘हर दिन, हर घर आयुर्वेद घर घर आयुर्वेद ’ ही या रथयात्रेची टॅगलाईन आहे. घराघरांत आयुर्वेद पोहचवण्यासाठी आयुर्वेदाचार्य कै. प्र. ता. जोशी (नाना) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रभा आयुर्वेद फाऊंडेशन, श्रीराम आयुर्वेद चिकित्सालय, लातूर संस्कृती फाऊंडेशन, रोटरी आणि इतर अनेकांच्या सहकार्याने ही आयुर्वेद रथयात्रा महाराष्ट्रातील 35 जिल्ह्यांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य करणार आहे. यासाठी अनेकांचे सहकार्य मिळालेले आहे.

1 डिसेंबर रोजी लातूर मधून संध्याकाळी 7 वाजता आयुर्वेद रथयात्रेचे प्रस्थान होणार आहे. 2 डिसेंबर रोजी आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन तुळजापूर येथून याचा शुभारंभ होणार आहे. 3 डिसेंबर रोजी पंढरपूर, 4 डिसेंबर रोजी पुणे, 5 डिसेंबर रोजी सातारा, 6 डिसेंबर रोजी सांगली, 7 डिसेंबर रोजी कोल्हापूर, 8 व 9 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग कणकवली, राजापूर 10 डिसेंबर रोजी पेण, 11 डिसेंबर रोजी दादर मुबई, 12 डिसेंबर रोजी पालघर, 13 डिसेंबर रोजी ठाणे, 14 डिसेंबर रोजी मालेगाव, 15 डिसेंबर रोजी जळगाव, 16 डिसेंबर चिखली, 17 डिसेंबर रोजी अकोला, 18 डिसेंबर रोजी अमरावती, 19डिसेंबर रोजी वर्धा, 20 डिसेंबर रोजी नागपूर, 21 डिसेंबर रोजी भंडारा, 22 डिसेंबर रोजी गोंदिया, 23 डिसेंबर रोजी गडचिरोली, 24 डिसेंबर रोजी चंद्रपूर, 25 डिसेंबर रोजी यवतमाळ, 26 डिसेंबर रोजी वाशिम, 27 डिसेंबर रोजी हिंगोली, 28 डिसेंबर रोजी जिंतूर, 29 डिसेंबर रोजी नांदेड, 30 डिसेंबर रोजी अहमदपूर, 31 डिसेंबर रोजी परळी, 1 जानेवारी रोजी जालना, 2 जानेवारी रोजी औरंगाबाद, 3 जानेवारी रोजी शिर्डी, 4 जानेवारी रोजी नंदुरबार, 5 जानेवारी रोजी धुळे येथे या रथयात्रेचा समारोप होणार आहे.

या रथयात्रेत प्रत्येक ठिकाणी आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य केले जाणार आहे. सर्व रोग तपासणी शिबिरांसोबतच मोफत औषधीचे वितरण केले जाणार आहे. आयुर्वेद दिंडी, आयुर्वेद प्रदर्शन, आयुर्वेद विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक वैद्यांची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे.

स्वयंपाक घरातील आयुर्वेद, पंचकर्म एक शाश्वत हेल्थ इंन्शुरन्स, आरोग्याचा मंत्र ऋतूचर्या व दिनचर्या, आधुनिक जीवनशैलीत आयुर्वेदाची प्रासंगिकता, आधुनिक जीवनशैली व आयुर्वेदाचे समर्पकत्व या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. या रथयात्रेचा लाभ राज्यातील जनतेला होईल.