बच्चू कडू हाजीर हो! मंत्रालय मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाने बजावली नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. चार वर्षांपूर्वी मंत्रालयात झालेल्या मारहाण प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने गुरुवारी त्यांना नोटीस बजावली आणि पुढील सुनावणीला हजर राहण्याचे सक्त आदेश दिले. त्यानुसार कडू यांना 3 जानेवारीला सत्र न्यायालयात व्यक्तिशः हजेरी लावावी लागणार आहे. यापूर्वी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटदेखील बजावले होते.

26 सप्टेंबर 2018 रोजी एका पोर्टलला विरोध करीत बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. त्यावेळी मंत्रालयात असलेल्या तत्कालीन संचालक प्रदीप जैन यांच्यासोबत त्यांनी बाचाबाची केली तसेच जैन यांना मारहाण केल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी कडू यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेच्या खटल्यात सध्या आरोपनिश्चितीसाठी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. गुरुवारी सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर झालेल्या सुनावणीवेळी बच्चू कडू गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने कठोर भूमिका घेत कडू यांच्याविरुद्ध नोटीस जारी केली.