आंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीहल्ला झाला. काल बदलापूरमध्ये बालिका अत्याचाराचा निषेध करणाऱया आंदोलकांबरोबरही तेच झाले. महाराष्ट्रात हा निर्दयीपणा सुरू आहे. लाठीहल्ल्याचा आदेश देणारा एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यातला खरा जनरल डायर कोण, हा माझा सवाल आहे. हा जनरल डायर महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या, असा घणाघात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केला.
हा महाराष्ट्र धनासमोर, दिल्लीसमोर झुकत नाही, तो छत्रपती शिवाजी महाराजांसमोर, संतांसमोर, मावळ्यांसमोर नतमस्तक होतो. भाजपप्रणीत अवकाळी खोके सरकारची हकालपट्टी कधी करायची याची जनता वाट पाहत आहे.
नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहात बुधवारी महाराष्ट्र स्वाभिमान सभेचा प्रारंभ झाला. त्याप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते. महिलांवर होणाऱया अत्याचाराबाबत त्यांनी सरकारचा समाचार घेतला. बलात्काऱयाला खरं तर भरचौकात फासावर लटकवलं पाहिजे, तोच खरा न्याय ठरेल. तसा न्याय करणाराच खरा भाऊ असेल, असे सांगून ते म्हणाले, बदलापूरमध्ये बालिकांवर अत्याचार करणाऱयाला दोन मिनिटं तरी तेथील रेल्वे स्टेशनवरील संतप्त महिलांच्या हाती सोपवायला हवे होते. न्याय मागणाऱया आंदोलकांवर लाठीहल्ला करायचा हा निर्दयीपणा महाराष्ट्रात सुरू आहे. आंतरवाली सराटीतही मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला झाला होता, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
महिलांवर लाठीहल्ला झाला तरी अजूनही त्यांनी माफी मागितलेली नाही. मिंधे गटाचे वामन म्हात्रे यांनी पत्रकार महिलेलाच सुनावलं. सगळं राजकारण सुरू आहे, असं भाजप आमदार किसन कथोरे म्हणतात. घटनाबाह्य मुख्यमंत्रीही तेच सांगत आहेत. खरे तर जी महिला तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती, तिला दहा तास बसवून ठेवण्यात आले, तिची मुख्यमंत्र्यांनी माफी मागायला हवी. अत्याचाराचा निषेध करणाऱ्या 300 आंदोलकांवर गुन्हे दाखल केले, बलात्काऱ्यापेक्षा जास्त दिवसांची कोठडी आंदोलकांना दिली हा कुठला न्याय आहे, महाराष्ट्र कुठे चाललाय, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला.
मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक, मुंबई-अहमदाबाद या रस्त्यांची अत्यंत दैन्यावस्था झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्यांवर येऊन त्यांची दुरवस्था पाहावी, असे आवाहनही त्यांनी केले.
उपनेते सुनील बागुल, खासदार राजाभाऊ वाजे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे, माजी आमदार वसंत गीते, डी. जी. सूर्यवंशी यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
या देशात कोणाची मस्ती, माज चालणार नाही
लोकसभेतील विजयाबद्दल कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे अभिनंदन करत आदित्य ठाकरे म्हणाले, ती फक्त निवडणूक नव्हती तर ती महाशक्तीशी लढाई होती. या देशात कोणाची मस्ती, माज चालणार नाही. येथे संविधानाचा कायदा आणि लोकशाहीच चालेल, हे लोकसभा निवडणुकीने दाखवून दिले. तसाच चमत्कार विधानसभा निवडणुकीतही होणार आहे. पराभवाच्या भीतीनेच महाराष्ट्र, झारखंडच्या निवडणुका पुढे ढकलण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यांच्यात बदलापूरला जाण्याची हिंमत नाही
बदलापूरला आंदोलन सुरू असताना गृहमंत्री हे दिल्लीत राजकारण करीत बसले होते, स्वतःसाठी काहीतरी मागायला गेलेले होते. घटनाबाह्य मुख्यमंत्री सुपरशेती करण्यासाठी त्यांच्या शेतावर गेले होते. त्यांच्या शेतात असं कोणतं रसायन आहे की, त्यांना फक्त पौर्णिमा, अमावास्येलाच जावं लागतं. बदलापूरला जाण्याची त्यांना हिम्मत झाली नाही.
आम्ही मदतही देऊ आणि सुरक्षाही देऊ
अडीच वर्षात महिला अत्याचाराविरोधात आपण अनेकदा आंदोलने केली, तेव्हा या सरकारला बहिणी आठवल्या नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर ही योजना जाहीर केली. आता दीड हजार देताय, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर वाढीव मदत देऊ, असे घटनाबाह्य मुख्यमंत्री सांगताय. हिम्मत असेल तर त्यांनी वाढीव मदत आताच द्यावी, कारण त्यांच्यावर महाराष्ट्राचा विश्वास नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना सुरूच ठेवू, वाढीव मदत देऊच; त्याचबरोबर सुरक्षाही देऊ, ही आमची ग्वाही आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
येवला, मनमाड येथे आज सभा
शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे उद्या गुरुवारी, 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता मनमाड शहरातील सगळे लॉन्स येथील सभेत शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील.