आकाश आनंद मायावतींचे उत्तराधिकारी

 

बहुजन समाजवादी पक्षाच्या सुप्रीमो मायावती यांनी त्यांचा पुतण्या आकाश आनंद याला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. आज रविवारी 10 डिसेंबर रोजी चार-पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या पदाधिकाऱयांची बैठक लखनौ येथे बोलवली होती.  तब्बल दीड तास ही  बैठक झाली. या बैठकीनंतर मायावतींनी आपला निर्णय जाहीर केला. आकाश हे मायावती यांच्या धाकटय़ा भावाचे पुत्र असून सध्या ते पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत.

बसपा प्रमुख मायावती यांनी छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर लखनौ येथे पदाधिकाऱयांची बैठक बोलावली होती. मायावती यांच्यासोबत आकाश आनंदही यावेळी उपस्थित होते. तब्बल 28 राज्यांच्या पदाधिकाऱयांनी बैठकीत सहभाग नोंदवला.  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत केलेल्या कामांचा अहवाल पदाधिकाऱयांनी यावेळी बैठकीत सादर केला. मायावती यांनी राष्ट्रीय समन्वयक आणि राज्य समन्वयकांकडून लोकसभेच्या तयारीचा अहवाल मागवला होता.