
बोरजाईवाडी येथे डोंगरउतारावर मंगळवारी सकाळी बैलगाडी शर्यतीचा डाव पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या पथकाने उधळून लावला. शासन व न्यायालयाची बंदी असतानादेखील बेकायदेशीररीत्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करत 4 पीकअप जीप जप्त करण्यात आल्या असून, एकूण 6 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
रमेश तुकाराम कदम, प्रकाश दुर्योधन कदम (दोघे रा. चंचळी), मुसा अस्लम सय्यद (रा. अपशिंगे), बलराम सुदाम चव्हाण (रा. सहकारनगर-संगमनगर, सातारा), सूर्यकांत हणमंत मच्छिंद्र, अविनाश अशोक घाडगे, नाना बाळू माने (तिघे रा. ल्हासुर्णे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस जवान किशोर भोसले यांनी फिर्याद दिली आहे.
बोरजाईवाडीत बैलगाडी शर्यत होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपअधीक्षक गणेश किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक फौजदार केशव फरांदे, जवान प्रमोद जाधव, किशोर भोसले, गृहरक्षक दलाचे जवान केतन शेंडगे यांनी सकाळी 10.40 च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत 6 लाख रुपये किमतीच्या चार पीकअप जीप जप्त करण्यात आल्या.



























































