
सामना प्रतिनिधी । संभाजीनगर
संभाजीनगरच्या औद्योगिक इतिहासात आज वेगळेच पान लिहिले गेले. शहराच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या भोगले कुटुंबियांच्या मालकीची निर्लेप अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी शेखर बजाज यांच्या बजाज इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपनीने खरेदी केली आहे.
निर्लेप अप्लायन्सेस प्रा. लि. आणि बजाज इलेक्ट्रिकल्स या कंपन्यांमध्ये वर्षभरापासून या व्यवहाराबद्दल चर्चा सुरू होती. आज या संदर्भातील करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानुसार बजाज इलेक्ट्रिकल्सने निर्लेप अप्लायन्सेसचे १०० टक्के समभाग खरेदी केले आहेत. एकूण ४७ कोटी रुपये उलाढाल असलेली ही कंपनी ४२.५० कोटी रुपयांना विकली गेली. करारानुसार विक्रीपश्चात येणाऱ्या दायित्वांचाही समावेश आहे. भोगले उद्योगसमूहाच्या मराठवाडा ऑटो कंपोनन्ट, उमासन्स ऑटो कंपोनन्ट, भोगले ऑटोमोटिव्ह तसेच निर्लेप अप्लायन्सेस या चार कंपन्या आहेत. पैठण रोडवर गेवराई तांड्याजवळ असलेली निर्लेप अप्लायन्सेस १९६८ मध्ये सुरू झाली. कंपनी कायदा १९५६ नुसार तिची नोंदणी झाली आणि कंपनी कायदा २०१३ नुसार त्यात दुरूस्त्या झाल्या. या कंपनीत जवळपास २०० कामगार, कर्मचारी आहेत. नॉनस्टिक भांडी बनवणारी, युरोपीयन राष्ट्रांमध्ये नॉनस्टिक भांड्यांची निर्यात करणारी आणि संपूर्ण ऑटोमॅटिक तंत्रज्ञान असलेली निर्लेप ही देशातील पहिली कंपनी ठरली. नॉनस्टिक भांड्यांच्या उद्योगात जगभर निर्लेपने नाव कमावले.
निर्लेपच्या जन्माचा इतिहास
नीळकंठ उर्फ नानासाहेब भोगले यांनी १९६२ मध्ये संभाजीपेठेत उमा सन्सची स्थापना करून मराठवाड्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर रेल्वेस्टेशन भागात औद्योगिक वसाहत स्थापन झाली आणि नानासाहेबांनी तेथे आपला उद्योग स्थलांतरित केला. स्टीलच्या आयातीवरील बंदीच्या धास्तीने नानासाहेबांनी प्लुऑन आयात केले. या प्लुऑनचा वापर करून भांडी तयार करण्यात आली आणि त्यातून निर्लेप वेअर इंडस्ट्रीजचा जन्म झाला. त्यांच्या या कंपन्यांच्या स्थापनेनंतरच त्यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगरात विविध उद्योग आले, वाढले, नावारूपास आले. निर्लेपमधून केवळ विदेशात उत्पादनेच निर्यात झाली नाहीत तर नैरेबी, दुबई यासारख्या शहरांत नानासाहेबांच्या थोरल्या मुलाने म्हणजे राम भोगले यांनी आपले तंत्रज्ञानही निर्यात करीत तेथील स्थानिकांना कारखाने काढून दिले.
निर्लेपचे नाव कायम राहील
या व्यवहाराच्या बाबतीत भोगले उद्योग समूहाचे प्रमुख, ज्येष्ठ उद्योजक राम भोगले म्हणाले, एखाद्या विदेशी कंपनीला आपली कंपनी विकण्यापेक्षा हिंदुस्थानी उद्योजकाला कंपनी विकण्यास आपण प्राधान्य दिले. या विक्री व्यवहारानंतरही निर्लेपचे ब्रॅन्डनेम कायम राहील तसेच निर्लेपचा अधिकाधिक विस्तार होईल.































































