
महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाविरुद्धचा लढा संघर्षानंतरही पायदळीच तुडवला गेला. कुस्तीत मौजमस्ती करणाऱया संघटकांची सत्ता आल्यामुळे हताश आणि अपमानित झालेल्या कुस्तीपटूंनी आता आपला मानसन्मान परत करत हिंदुस्थानी कुस्ती महासंघाच्या नवअध्यक्षांना तोंड लपवायलाही जागा ठेवली नाही. आपल्या महिला कुस्तीपटूंना अपमानित केल्यानंतर मी सन्मानाने जगूच शकत नाही, असे आयुष्य मला सदैव बोचत राहील म्हणून माझा मान ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर करून ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनियाने ‘पद्मश्री’ पुरस्कार थेट पंतप्रधानांच्या निवासासमोरील फुटपाथवर ठेवत कुस्ती महासंघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संजय सिंह यांच्याविरुद्धचा संताप व्यक्त केला.
संजय सिंह यांच्या विजयानंतर ऑलिम्पिक पदक विजेती महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्त होत असल्याचा धक्कादायक निर्णय घेतला होता. या धक्क्यातून सावरतो तोच आज हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनियाने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपण ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करत असल्याची घोषणा करून कुस्ती महासंघाच्या पायाखालची जमीनच सरकवली. ‘मी माझा ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रधानमंत्री यांना परत करत आहे हेच सांगण्यासाठी मी हे पत्र लिहीत आहे,’ अशा शब्दांत बजरंगने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
हिंदुस्थानच्या महिला कुस्तीपटूंनी भाजप खासदार आणि कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्यावर शोषणाचे आरोप केले होते. बृजभूषण यांच्याविरुद्ध कुस्तीपटूंनी आंदोलनदेखील केले होते, मात्र कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत बृजभूषण यांच्या जवळचे संजय सिंह यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे आंदोलक कुस्तीपटूंनी टोकाचे पाऊल उचलले.
View this post on Instagram
बजरंगनेदेखील पंतप्रधानांना पत्र पाठवून ‘पद्मश्री’ पुरस्कार परत करत असल्याचे सांगितले. ‘आशा करतो की तुम्ही बरे असाल. तुम्ही देशाची सेवा करण्यात व्यस्त आहात. तरीही तुमचं लक्ष आमच्या कुस्तीकडे वळवण्याचा माझा प्रयत्न आहे. आम्ही बृजभूषण यांच्याविरोधात आरोप करत उपोषणाला बसलो. आपल्या आश्वासनानंतर आम्ही आंदोलन मागे घेतले, तरीही काही झाले नाही. दिल्ली पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करून त्रास दिला. आम्हाला केवळ आश्वासने मिळाली. आता निवडणुकीत बृजभूषणने पुन्हा महासंघावर कब्जा केला. महिला कुस्तीपटूंना असे अपमानित केले जात असताना हा पुरस्कार घेऊन मी जगू शकत नाही. त्यामुळे मी हा पुरस्कार परत करतोय.




























































