
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याच्याकडील जप्त केलेल्या आयफोनसह इतर आरोपींकडून हस्तगत केलेले सात फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. दुसरीकडे न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांनी माहिती गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
जरे हत्याकांडमध्ये आतापर्यंत पाच आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. मुख्य आरोपी बाळ बोठेला तीन महिन्यांनी अटक केली आहे. त्यामुळे नेमकी घटना कशी घडली? का घडली? याचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. हत्याकांड कशामुळे केले? का केले? हे आता दुसरे पथक दाखल झाल्यानंतर उघड होणार आहे. पोलिसांनी बोठेच्या घराची झडती घेऊन जप्त केलेला आयफोन तसेच हैदराबाद येथे वापरत असलेला फोन जप्त केला आहे. हैदराबाद येथील वकील जनार्दन अकुला यालाही पोलिसांनी अटक केली असून, त्याचाही मोबाईल जप्त केला आहे. या घटनेत ज्याचा सहभाग आढळून आलेला होता असे एकूण सात लोकांचे फोन फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीला पाठविले आहेत.
सोमवारी पाचजणांचे जबाब होणार आहेत. बोठे हा ज्या वेळेला माहिती सांगत होता त्या वेळेत तो सुरुवातीला दहा दिवस नगरच्या रेल्वेस्थानकांमध्ये राहत होतो, असे सांगितले. त्या दृष्टिकोनातून आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
























































