
सामना प्रतिनिधी । चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कर्मचाऱ्याचा काल अपघाती मृत्यू झाला. त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप करून कर्मचाऱ्यांनी आज मृतदेह महाविद्यालयात ठेऊन न्यायाची मागणी केली. या प्रकारामुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन नसल्यानं हा कर्मचारी मानसिकदृष्ट्या खचला होता, असं सहकाऱ्यांचं म्हणणं आहे.
बल्लारपूर इन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच बीआयटी या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत कर्मचारी अमर नगराळे यांचा काल रात्री अपघाती मृत्यू झाला. हा मृत्यू तणावामुळं झाल्याचं आता बोललं जात आहे. मागील आठ महिन्यांपासून महाविद्यालयातील सुमारे तीनशेहून अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात आलेले नाहीत. या सर्व कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व अमर नगराळे करीत होते. वेतन नसल्यानं कुटुंबाच्या गरजा कशा भागवायच्या या विवंचनेत ते होते. त्यातच त्यांचा काल अपघाती मृत्यू झाला. मात्र, हा अपघात नसून घातपात आहे. कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी ते झटत असल्यानं त्यांना मारण्यात आलं, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी केला आहे. या कुटुंबाला न्याय मिळावा, यासाठी इथल्या कर्मचाऱ्यांनी अमर नगराळेंचा मृतदेह आज संस्थाप्रमुख बाबासाहेब वासाडे यांच्या केबिनमध्ये आणला आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत तिथेच ठेवण्याचा इशारा दिला. हे अभियांत्रिकी महाविद्यालय राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब वासाडे यांचे आहे. वासाडे यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी पैसे नसल्याचे सांगत मागील आठ महिन्यांपासून ते रोखून ठेवले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीच्या दिवशी त्यांच्या घरापुढेही आंदोलन केले होते. आता या मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, वेतनासाठी मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिलाय.


























































