
जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या मलबार हिलमधील बाणगंगा परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार असून टिकाऊ आणि आकर्षक रस्ते, फुटपाथ करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिका एक कोटीची निधी खर्च करणार आहे.
बाणगंगा परिसराला अधिक आकर्षक करण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. बाणगंगा परिसरातील कवळे मठ पालिका शाळेपासून डोंगरशी रोड ते बाणगंगेच्या टोकापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे तसेच वाळकेश्वर रोड येथे ह्यूइंग डेक ते शीतल बाग पदपथाच्या भिंतीची व फुटपाथ आकर्षक करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका एक कोटी रुपयांचा निधी खर्च करणार आहे.
पर्यटनाचा दर्जा
बाणगंगा परिसराला दरदिवशी पर्यटक भेट देत असतात. त्यात बाणगंगा परिसराला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढला आहे. बाणगंगा तलावाच्या आतील व परिसराचे हेरिटेज विभागाकडून जतन व देखभाल करण्यात येते तर तलावाचे व्यवस्थापन ट्रस्टच्या माध्यमातून केले जाते. त्या पार्श्वभूमीवर, बाणगंगा परिसर अधिक आकर्षक दिसावा यासाठी या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
























































