बार्टी, सारथी, महाज्योती फेलोशिप परीक्षेचा बट्टय़ाबोळ, सी, डी प्रश्नसंच सीलबंद नसल्याचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ या संस्थांमार्फत फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱया संयुक्त चाचणी परीक्षेचा दुसऱयांदा बट्टय़ाबोळ झाला आहे. पुणेसह नागपूर, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावर आज ही परीक्षा पार पडली. मात्र परीक्षार्थ्यांना दिल्या जाणाऱया चार प्रश्नपत्रिका संचापैकी दोन संच सीलबंद नसल्याचे आढळून आले. यामुळे परीक्षा केंद्रावर एकच गोंधळ उडाला. सील नसलेली किंवा सील उघडलेली प्रश्नपत्रिका स्वीकारू नये, अशा स्पष्ट सूचना असताना परीक्षागृहात सील नसलेल्या प्रश्नपत्रिका आल्याच कशा, असा प्रश्न उपस्थित करून सर्वच परीक्षा केंद्रांवरील परीक्षार्थ्यांनी या परीक्षेवर बहिष्कार घातला. काहींनी तर पेपर फुटल्याचा दावा केला असून या गोंधळानंतर परीक्षार्थ्यांनी पुन्हा एकदा सरसकट फेलोशिप देण्याची मागणी लावून धरली आहे.

पीएचडी फेलोशिपच्या संयुक्त चाळणी परीक्षेचे आयोजन करण्याची जबाबदारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाकडे होती. सेट विभागाने प्रश्नपत्रिका छपाईचे काम एका त्रयस्थ संस्थेला दिले होते. या संस्थेने ए आणि बी प्रश्नसंच छापून त्याला सील बंद करून दिले, परंतु सी आणि डी हा प्रश्नसंच त्याने छपाई करून दिला नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाला सी आणि डी प्रश्नसंच स्वतः छापून घ्यावे लागले. विद्यापीठाने छपाई केलेल्या प्रश्नपत्रिका संचांना सील नसल्याचे समोर आले आहे. परीक्षा केंद्रात काही विद्यार्थ्यांनी सीलबंद पाकिटातील तर काहींना सील नसलेल्या पाकीटातील प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. या परीक्षेला केवळ 3 हजार 475 परीक्षार्थीच बसले होते. तरीदेखील सलग दुसऱयांदा परीक्षेचे आयोजन फेल गेल्याचा आरोपही होत आहे.

परीक्षा प्रक्रिया पारदर्शकच

प्रश्नपत्रिकांची छपाई दोन वेगवेगळ्या मुद्रणालयांकडून गोपनीयरीत्या करण्यात आली. त्यामुळे छपाईच्या स्वरूपामध्ये बदल असू शकतो. प्रश्नपत्रिका संचाची सुरक्षा मानकांचे पालन करून छपाई करण्यात आली आणि ते परीक्षा केंद्रावर सीलबंद स्वरूपात पोहोचविण्यात आले. संपूर्ण परीक्षा प्रक्रिया सर्व परीक्षा केंद्रांवर पारदर्शकपणे पार पडली आहे. त्यामुळे पेपरफुटीचे आरोप हे निराधार असून त्यात तथ्य नाही.
प्रा. बी. कापडणीस, सेट समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

परीक्षार्थ्यांचा विश्वास उडाला

फेलोशिपसाठी घेण्यात येणाऱया चाळणी परीक्षेवरून आता परीक्षार्थ्यांचा विश्वास उडाला आहे. सलग दुसऱयांदा या परीक्षेत गोंधळ झाला. वर्ष 2022 मध्ये ‘महाज्योती’, ‘सारथी’ने परीक्षार्थ्यांची परीक्षा न घेता सरसकट फेलोशिप दिली. मात्र ‘बार्टी’ने फेलोशिपसाठी परीक्षा घेतली. त्यामुळे एकच फेलोशिपसाठी दोन विरोधी निर्णय का, असा सवाल त्यावेळी उपस्थित झाला होता. आताही सरसकट फेलोशिपची मागणी केली होती. मात्र ती धुडकावत परीक्षा घेण्यात आली. सील नसलेल्या प्रश्नपत्रिका पाहताच सर्वचजण परीक्षा केंद्राच्या बाहरे पडले. मुंबईतील अनेक परीक्षार्थी या परीक्षेसाठी पुणे केंद्रावर पोहोचले होते.
सुशील शेजुळे, परीक्षार्थी, मुंबई

यापूर्वी 24 डिसेंबरला फेलोशिप परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेवर परीक्षार्थ्यांनी आक्षेप घेतला. वर्ष 2019 ची सेट परीक्षेची परीक्षा जशीच्या तशी या फेलोशिप परीक्षेसाठी देण्यात आली होती. परीक्षार्थ्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यावर ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर परीक्षार्थ्यांना नव्याने हॉलतिकीट देण्यात आले. या हॉलतिकिटानुसार बुधवारी परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेत सील नसलेल्या प्रश्नपत्रिकांचे वाटप केल्याने गोंधळ उडाला. परीक्षार्थी पेपर न देताच परीक्षागृहाच्या बाहेर पडले.