
ही लढाई एकटय़ा शिवसेनेची नाही, विचारांची धगधगती मशाल घेऊन सज्ज व्हा!
नियतीच्या मनात काय असते याची कुणालाच कल्पना नसते. कदाचित तिच्या मनात हेच असेल की आता नेमक्या मर्द लोकांच्या हाती मशाल देण्याची आवश्यकता आहे.
‘प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयात जावे लागते. मैदानासाठी न्यायालयात जा. उमेदवारीसाठी न्यायालयात जा. अरे हिंमत असेल तर मैदानात या ना. मी तयार आहे. मी आता मैदानात उतरलोय. समोरासमोर या. होऊन जाऊ दे काय ते,’ असे खुले आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपा आणि गद्दार एकनाथ शिंदे गटाला दिले. ‘शिवसेनेला मैदान कसे मिळणार नाही यावर लक्ष देण्यापेक्षा एकत्र मैदानात या, मग दाखवतो’ असे त्यांनी ठणकावून सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा अमृत महोत्सवी सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मिंधे गटाचा समाचार घेतला. शिवसेनेचा जन्मच मुळी लढण्यासाठी झाला असून शिवसेनेला रोज धक्के बसत असतात, पण आम्ही हिमतीने त्यांना तोंड देतोय, असे सांगतानाच शिवसेना आता धक्काप्रूफ झाली असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
भुजबळ शिवसेनेत असते तर मुख्यमंत्री झाले असते
उद्धव ठाकरे यांनी यावेळी छगन भुजबळ यांना शुभेच्छा देतानाच जुन्या आठवणींना उजाळा दिला. ‘चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते’ असे अजित पवार म्हणाले. पण मी सांगतो की, ‘छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
‘भुजबळ यांनी शिवसेना सोडली तो आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. त्यातून सावरायला खूप वेळ लागला, पण भुजबळांनी बाळासाहेब असतानाच सर्व मतभेद मिटवले ही गोष्ट चांगली केली. त्यावेळी माँसाहेब असत्या तर आणखी चांगले झाले असते.’, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडताना भुजबळ एकटे गेले, पण महाविकास आघाडीच्या स्थापनेवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला सोबत आणले, असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले.
‘प्रत्येकाचेच वय वाढत असते. बाळासाहेब नेहमी सांगायचे की माणूस वयाने मोठा होत असतो, पण ज्या क्षणी तो विचारांनी थकतो तेव्हा वृद्ध होतो. छगन भुजबळ असोत, फारुख अब्दुल्ला असोत किंवा शरद पवार, ही तरुण मनाची माणसे आहेत. आणि नुसते मन तरुण असून चालत नाही, तर तुमच्या मनात एक जिद्द आणि ईर्षाही असावी लागते.’ असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
विधानसभेत आता कोण काय बोलते कशाचा धरबंध नाही!
‘‘याआधी विधानसभेची उंची वेगळीच होती, ते नुसते मजले नव्हते, एफएसआय नव्हता तर वैचारिक एफएसआय अधिक होता. मी स्वतः एक-दोनदा तिथल्या गॅलरीतून केशवराव धोंडगे यांचे भाषण ऐकलेले आहे. विधानसभेत छगन भुजबळ, त्याआधी वामनराव महाडिक हे शिवसेनेचे एकमेव आमदार होते. त्या वेळी वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते, त्यांनी शिवसेनाप्रमुखांना सांगितले, बाळासाहेब तुम्ही काय माणूस विधानसभेत पाठवलाय, एक माणूस पाठवलाय पण तो बोलायला उभा राहिला की सर्व सभागृह स्तब्ध राहून त्याचे भाषण ऐकत बसते. हल्ली कोण काय बोलते, कोण काय बोलते कशाचा धरबंध कशाला नाही,’’ अशी खंत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. सीमा आंदोलनात भुजबळ हे खोटी दाढी लावून वेष बदलून बेळगावात गेले होते. तो संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी या वेळी मिंधे गटावर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘‘भुजबळसाहेब पहिली निवडणूक हरूनसुद्धा तुम्ही जिद्दीने उभे राहिलात. बेळगावात तुम्ही ज्या वेशभूषेत गेलात ते बघितले तर मला म्हणतील बघा कसं हिंदुत्व सोडलं!’’
विचाराने राजकारण करण्याची गरज
सतत आणि सतत राजकारणाचा विचार करण्यापेक्षा विचाराने राजकारण करणे किती गरजेचे आहे याचाच कोणी विचार करत नाही, अशा शब्दांत विरोधकांना सुनावताना, मला पाहिजे… सगळं पाहिजे… प्रतिस्पर्धी शिल्लकच राहता कामा नये… अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला.
ही नियतीचीच इच्छा असेल!
‘छगन भुजबळ हे वयाची पंच्याहत्तरी पूर्ण करीत आहेत आणि योगायोगाने देशाच्या स्वातंत्र्यालाही पंच्याहत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांपूर्वीच्या ऑक्टोबरमध्ये जर कोणी सांगितले असते की, भुजबळांच्या पंच्याहत्तरीला मला बोलावले जाईल आणि आपण सगळे एका व्यासपीठावर येणार आहोत तर कोणाचाच विश्वास बसला नसता. असं म्हणतात की, नियतीच्या मनात काय असते याची कुणालाच कल्पना नसते. कदाचित तिच्या मनात हेच असेल की, आता नेमक्या मर्द लोकांच्या हाती मशाल देण्याची आवश्यकता आहे.’ असे उद्धव ठाकरे यांनी सांगताच टाळ्य़ांच्या कडकडाटाने सभागृह दुमदुमले.
मी लढाईचीच वाट बघतोय
जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हेसुद्धा या सोहळ्याला उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी यावेळी फारुख अब्दुल्ला आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मैत्रीची आठवण सांगितली. ते म्हणाले की, ‘फारुख अब्दुल्ला आणि बाळासाहेबांची चांगली मैत्री होती. ते आल्या आल्याच मला म्हणाले. अजिबात घाबरू नकोस, वडिलांसारखा लढ.’ ही लढाई आम्ही सोडणार नाही, असा ठाम निर्धार व्यक्त करून उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, ‘भुजबळांचा इथे वादळ म्हणून उल्लेख झाला. अशी अनेक वादळे शिवसेनेने अंगावर घेतलीत. कारण त्यावेळी अशी अनेक वादळे शिवसेनेसोबत होती. आताच्या वादळातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारखी वादळे शिवसेनेसोबत आहेत. वादळे निर्माण करणारे शरद पवार सोबत आहेत. वादळ असो वा पाऊस असो, न डगमगता उभे राहणारे सोबत असताना मी तर लढाईच्या क्षणाचीच वाट बघतोय.’ असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी प्रचंड टाळ्या आणि घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
ही देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई
‘एक नवीन समीकरण आपण महाराष्ट्रात जन्माला घातले महाविकास आघाडी. हे समीकरण जुळवून दाखविल्यानंतर विरोधकांना पोटशूळ उठला. सरकार पाडले, पण आणखी किती खालच्या पातळीवर जाणार?’ असा सवाल विरोधकांना करतानाच उद्धव ठाकरे यांनी, ही लढाई एकटय़ा शिवसेनेची नाही तर देशाच्या स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, नुसती निशाणी नाही तर विचारांची धगधगती मशाल घेऊन सज्ज व्हा, असे जबरदस्त आवाहन उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना यावेळी केले. उद्धव ठाकरे बोलत असताना उद्धव साहेब आगे बढो अशी घोषणा झाली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी नुसते नेत्याचा जयजयकार करून चालणार नाही. नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. सोबत येणार आहात का? असा सवाल केला. तेव्हा सभागृहातील उपस्थितांनी एका सुरात ‘हो’ असा प्रतिसाद दिला.




























































