मुंबईत रात्रीची संचारबंदी, दिवसाची जमावबंदी हटवली; चौपाटय़ा, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळेही सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत कोरोना नियंत्रणात आल्यामुळे  मुंबईत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत असणारी संचारबंदी आणि दिवसाची जमावबंदी हटवण्यात आली आहे. शिवाय मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे, चौपाटय़ा नियमित वेळेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी परिपत्रक जारी केले.

मुंबईमध्ये डिसेंबरअखेर कोरोनाच्या तिसऱया लाटेत दैनंदिन रुग्णांची संख्या थेट 21 हजारांवर गेल्याने मुंबईत निर्बंधांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली होती. यामध्ये रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली होती. मात्र मुंबईसह संपूर्ण राज्यभरात कोरोना नियंत्रणात आल्यामुळे सोमवारीच अनेक निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली होती. मात्र याच्या अंमलबजावणीचे अधिकार स्थानिक प्रशासनांना देण्यात आले होते. त्यानुसार पालिका आयुक्तांनी मुंबईत लागू असलेले अनेक निर्बंध 1 फेब्रुवारीपासून शिथिल होत असल्याबाबतचे परिपत्रक जारी केले.

अशी राहणार नियमावली

  • समुद्रकिनारे, गार्डन, पार्क नियमित वेळेनुसार सुरू राहणार
  • मनोरंजन पार्क, थीम पार्क, स्विमिंग पूल, वॉटर पार्क्स 50 टक्क्यांच्या क्षमतेने
  • रेस्टॉरंट, चित्रपटगृहे, नाटय़गृहे नियमित वेळेनुसार 50 टक्क्यांच्या क्षमतेने
  • भजने आणि इतर अनेक स्थानिक सांस्कृतिक आणि मनोरंजनाचे कार्यक्रम हॉल किंवा मंडपांमध्ये 50 टक्के क्षमतेने
  • लग्न समारंभासाठी मोकळ्या मैदानांमध्ये 25 टक्के क्षमतेने आणि हॉलमध्ये 200 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी
  • खेळ, घोडय़ांच्या शर्यतींसह इतर अनेक कार्यक्रम 25 टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहतील. हे 25 टक्के बसण्याच्या जागेनुसार मोजण्यात येतील. या कार्यक्रमांना उभ्याने उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच फिरत्या लोकांनाही परवानगी नसेल
  • आठवडी बाजार नियमित वेळेनुसार सुरू राहणार

मुंबईत पॉझिटिव्हीटी रेट घटला
मुंबईत चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण चांगलेच घटले असून 1.5 टक्क्यांवर आले आहे. मुंबईत गेल्या 24 तासांत झालेल्या 51 हजार 492 चाचण्यांत 803 कोरोनाबाधित आढळले आहेत. बाधितांचे प्रमाण घटल्याने मुंबईसाठी समाधानकारक चित्र निर्माण झाले आहे. मुंबईत आढळलेल्या बाधितांमध्ये 152 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यात 31 जणांना ऑक्सिजनची गरज लागली.  तर दिवसभरात 1800 जणांनी कोरोनावर मात केल्याने मुंबईत आता 8888 सक्रिय रुग्ण राहिले आहेत. यातील 90 टक्क्यांहून जास्त जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. दरम्यान, मुंबईत गेल्या 24 तासांत सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.