
भाजपमध्ये सातत्याने पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर अन्याय होत आहे. भाजपमध्ये सुरू असलेल्या या एकाधिकारशाहीला बीडमध्ये मुंडे समर्थकांनी थेट आव्हान देत राजीनामे दिले आहेत. यात 11 तालुकाध्यक्षांसहित 25 प्रमुख पदाधिकाऱ्याचा समावेश आहे.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपला महाराष्ट्रात ऐश्वर्याचे दिवस दाखवले. मात्र, त्यांच्या पश्चात त्यांच्या वारसदार असलेल्या पंकजा मुंडे व खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यावर भाजपमध्ये सातत्याने अन्याय होत आहे. परळी विधानसभा मतदारसंघात झालेल्या पंकजा मुंडे यांच्या पराभवाला भाजपच्याच काही ज्येष्ठ नेत्यांनी हातभार लावला, अशी संतप्त भावना त्यांच्या समर्थकांमध्ये आहे. त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी नाकारण्यात आली. नुकत्याच झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात शेवटपर्यंत डॉ. प्रीतम मुंडे यांचे नाव चर्चेत होते. मात्र, ऐनवेळी अवघ्या वर्षभरापूर्वी राज्यसभेवर गेलेले डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. मुंडे भगिनींवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाला त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर वाचा फोडली. ‘ताई, किती दिवस भाजपला आपलं मानायचं’, असा सवाल समर्थकांनी केला.
पंकजा व डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींवर भाजपमध्ये होत असलेल्या अन्यायाविरोधातली खदखद आज बाहेर आली. बीड जिल्ह्यातील भाजपच्या 11 तालुकाध्यक्षांसह 25 प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले. या राजीनामासत्राने सर्वत्र खळबळ उडाली असून हे सत्र सुरूच राहणार असल्याचे नाराज कार्यकर्त्यांनी सांगितले.
राजीनामा दिलेले पदाधिकारी
सविता रामदास बडे – जिल्हा परिषद सदस्य
प्रकाश खेडकर – पंचायत समिती सदस्य
अॅड. सुधीर घुमरे – पाटोदा तालुकाध्यक्ष
अरुण राऊत – माजलगाव तालुकाध्यक्ष
भगवान केदार – केज तालुकाध्यक्ष
सतीश मुंडे -परळी तालुकाध्यक्ष
बाळासाहेब तोंडे – धारूर तालुकाध्यक्ष
पोपट शेंडगे – वडवणी तालुकाध्यक्ष
अच्युतराव गणगे – अंबाजोगाई तालुकाध्यक्ष
डॉ.मधूसुदन खेडकर – शिरूर तालुकाध्यक्ष
डॉ. वासुदेव नेहरकर – वैद्यकीय आघाडी जिल्हाध्यक्ष
डॉ. लक्ष्मण जाधव – भटके विमुक्त आघाडी
धनंजय घोळवे – दिव्यांग आघाडी
संग्राम बांगर – विद्यार्थी आघाडी
बबन सोळंके – जिल्हा सचिव
प्रदीप नागरगोजे – विद्यार्थी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष































































