
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड नगरपालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात सार्वजनिक ठिकाणी धूर फवारणीसाठी पाच फॉगिंग मशीन दाखल होणार असून उद्या सोमवारपासून मशीनद्वारे फवारणी सुरू करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव लक्षात घेता बीड नगरपालिकेने सतर्कता दाखवत शहरातील वितरण व्यवस्थेसाठी विविध ठिकाणी नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिली तसेच सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच भाजी मार्केट, सार्वजनिक चौक, शौचालय आणि रस्त्यावर जिथे गर्दीची ठिकाणे आहेत अशा ठिकाणी सोडियम हायड्रोक्लोराईड या जंतूनाशकाची फवारणी तात्काळ हाती घेण्याच्या सूचना नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी शनिवारी मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे व नपच्या अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार आज पाच फॉगिंग मशीन दाखल होत असून उद्या सोमवारपासून नगरपालिकेच्यावतीने जंतुनाशक फवारणी सुरू होणार आहे. यामुळे कोरोना विषाणूंला आळा बसेल. नगरपालिकेच्यावतीने संपूर्ण प्रयत्न केले जात असून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता आपला जीव धोक्यात न घालता आहे त्याच ठिकाणी थांबावे असे आवाहनही डॉ. क्षीरसागर यांनी केले आहे.




























































