
बीडमध्ये जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. माय-लेकाच्या नात्याची चौकट मोडून एकत्र आलेल्या सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अंबाजोगाईत अत्यंत थरारक झाला आहे. अनैतिक संबंध उघडकीस आल्यानंतर बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर त्याच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, केज तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी साहेबराव पवार (वय – 40) यांचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. संसार सुरू असतानाच साहेबराव यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल साहेबराव पवार (वय – 21) याचे आपल्या सावत्र आईशी प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांपूर्वी हे दोघेही घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले.
पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने साहेबराव पवार यांनी केज पोलिसांत तक्रार दाखल केली केली होती. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल लोकेशन ट्रेस करून साहेबराव यांच्यासह तेलंगणा गाठले आणि त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता समाजासमोर आल्याच्या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला तातडीने अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयात (स्वराती) उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अनिलचा मृत्यू झाला.
अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिता हिला तीव्र धक्का बसला. हा विरह सहन न झाल्याने तिने स्वराती रुग्णालयाच्या व्यंकटराव डावळे सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका शासकीय शिरीषच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळताच रुग्णालयाचे डॉ. धपाटे यांनी तातडीने अंबाजोगाई शहर पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक कांदे व मंगेश भोले हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा केला. यावेळी उपस्थित केलेले डॉ. निलेश पुरी आणि डॉ. नितीन साखरे यांनी अनिताची कायदेशीर वैद्यकीय तपासणी करून तिला मृत घोषित केले. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.
































































