गाढवाचे मटण खाल्ल्याने सेक्स पॉवर वाढते ?

donkey-1

आंध्र प्रदेशात अचानक गाढवाच्या मटणाची मागणी वाढायला लागली आहे. मागणी वाढण्यामागचं कारण काय आहे हे शोधून काढण्याचा तिथलं प्रशासन प्रयत्न करत आहे. प्राथमिक तपासामध्ये जी कारणं कळाली आहेत ती धक्कादायक आहेत. गाढवाचे मांस खाल्ल्याने पाठीदुखी, अस्थमाचा त्रास दूर होतो असा काहींचा समज आहे. असा समज असणाऱ्यांची आंध्र प्रदेशात संख्या जास्त आहे. यामुळेच गाढवाच्या मटणाला असलेली मागणी वाढीस लागली असल्याचं सांगितलं जात आहे. या मटणाला असलेली मागणी वाढण्यामागे आणखी एक कारण सांगितलं जात आहे.

गाढवाचे मटण खाल्ल्याने कामोत्तेजना वाढते असा काहींचा समज आहे. या समजामुळे देखील गाढवाच्या मटणाला असलेली मागणी वाढीस लागल्याचं बोललं जात आहे. आंध्र प्रदेशातील प्रकासम, कृष्णा, पश्चिम गोदावरी आणि गुंटूर जिल्ह्यात गाढवाचे मटण सर्वाधिक खाल्ले जाते असे प्राणीमित्र गोपाळ सुराबथुला यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की गुरुवारी आणि रविवारी गाढवाच्या मटणाला सर्वाधिक मागणी असते. उच्चशिक्षित, चांगल्या घरातली माणसंही हे मटण खरेदी करायला येतात. या दोन दिवसांत जवळपास 100 गाढवांची कत्तल केली जाते असा दावाही त्यांनी केला आहे. आंध्र प्रदेशात गाढवांची संख्या कमी होत चालल्याने गाढव कापणारे खाटीक कर्नाटक, तमिळनाडू आणि महाराष्ट्रातून ती आणत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

गाढवाचे मटण 600 रुपये किलो दराने विकलं जातं. गोपाळ सुराबथुला यांनी माहिती देताना सांगितलं की गाढवाचं मटण खाण्याचं फॅड प्रकासम जिल्ह्यातील स्टुअर्टपुरम भागातून वाढलं. हा भाग चोर, दरोडेखोरांमुळे बदनाम होता. असा समज आहे की गाढवाचं रक्त प्यायल्याने माणूस अधिक वेगाने पळू शकतो. दरोडेखोरांनी हा समज पसरवला असून चोरी करून किंवा, दरोडा टाकून वेगात पळून जाण्यासाठी हा मार्ग अवलंबायचे असं सांगितलं जातं. क्रॅक नावाच्या एका तेलुगू चित्रपटात अभिनेता रवी तेजा आणि अभिनेत्री श्रृती हसनने गाढवाचं रक्त पिऊन वेगात पळाल्याचं दाखवलं आहे. यामुळेही गैरसमज पसरण्यास मदत झाल्याचं गोपाळ सुराबथुला यांनी सांगितले आहे. 2001 आणि 2011 साली आंध्र प्रदेश सरकारने गाढवांची कत्तल करू नये असे आदेश काढले होते, तरीही तिथे गाढवांची कत्तल सुरूच आहे.