बेनेट रिबेलो हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

613

बेनेट रिबेलो यांची हत्या करून शरीराचे तुकडे केल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींना मदत करणाऱया एका 19 वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट-5 ने अटक केली आहे. अली उमरमियाँ चाऊस असे त्याचे नाव असून तो अल्पवयीन आरोपीचा मित्र आहे.

बेनेट यांची मानलेली मुलगी रिया व तिच्या अल्पवयीन प्रियकराने अत्यंत निर्दयीपणे बेनेट यांची हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून ते सुटकेस, पिशवी आणि बबल रॅपमध्ये गुंडाळून मिठी नदीत फेकले होते. त्यानंतर माहीम आणि प्रभादेवी समुद्रकिनारी तसेच मिठी नदीत बेनेट यांच्या शरीराचे अवयव सापडले होते. दरम्यान, प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साहिल, पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण व पथक आरोपींकडे चौकशी करीत असताना घाटकोपरच्या असल्फा व्हिलेज येथे राहणाऱया अली नावाच्या तरुणाचे नाव समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. रिया व तिच्या प्रियकराने बेनेट यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते तुकडे सुटकेस व बबल रॅपमध्ये बांधत असताना त्यांना सेलोटेप देण्याचे काम अलीने केले होते. तसेच बेनेट यांचे मुंडक्यापासून धड पॅक करण्यासाठी लागणारे साहित्य आणण्यासाठीदेखील अली आरोपींसोबत दुकानात गेला होता. त्या रात्री अली बेनेट यांच्याच घरी थांबला होता असे तपासात समोर आल्याने अली यास अटक करण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या