
भंडारी एज्युकेशन सोसायटी मालवणच्या मनमानी कारभाराविरोधात अखेर सर्व सभासदांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर आणि सेक्रेटरी सावजी करलकर यांनी चालवलेल्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी नुकतीच संस्थेच्या सभासदांची बैठक शिवाजी पार्क नागरिक संघात पार पडली. या बैठकीत संस्थेत सुरू असलेल्या चुकीच्या कामांविरोधात योग्य वेळी अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
संस्थेच्या व कार्यकारिणीच्या वरिष्ठ सभासदांनी आतापर्यंत अनेकदा अध्यक्ष आणि सेक्रेटरींना पत्राद्वारे गैरकारभाराच्या प्रकरणांची विचारणा केली. मात्र या पत्रांना उत्तरेच मिळालेली नाहीत. संस्थेच्या वार्षिक जमाखर्चाचा तपशील जाहीर न करणे, घटना – नियमांची प्रत न देणे, भंडारी ज्ञातीतील सुशिक्षित मंडळींना गेली दहा वर्षे मागणी करूनही सभासद न करणे आदी प्रकार पाटकर आणि करलकर करीत असून हे दोघेही सभासदांच्या कायदेशीर हक्कांचे जाणीवपूर्वक खच्चीकरण करत असल्याचा आरोप या बैठकीत करण्यात आला.
संस्थेचे ऑडीटर आर. आर. पोटफोडे यांनी संस्थेच्या आर्थिक खर्चाबाबत केलेल्या टिपणीवरून संस्थेचे आर्थिक व्यवहार हे घटनेनुसार व नियमांप्रमाणे होत नसल्याचे दिसत आहे. तसेच संस्थेचे बेकायदेशीर कार्यकारी मंडळ जाणीवपूर्वक संस्थेचा कालावधी पूर्ण होऊन गेल्यावरसुद्धा (31 मार्च 2022) नव्या कार्यकारी मंडळाच्या निवडीसाठी निवडणुका घेत नसल्यामुळे इतर सभासदांनी जाहीर निषेध नोंदविला आहे. शाळेच्या इमारतींच्या रिपेअरिंगची कामे काढून पैशाची उधळपट्टी करणे. आतापर्यंतचे फिक्स्ड डिपॉझीट मोडण्याचा ठराव मासिक सभेत आणणे. संस्थेच्या मालकीची सागाची झाडे विकून पैसा उभा करता येईल का, याचाही विचार सध्या अध्यक्ष आणि सेक्रेटरी मंडळींचा सुरू असून याविरोधात सभासदांनी संताप व्यक्त केला आहे.

























































