
खंडणीच्या धमकीला पंटाळून भोजपुरी अभिनेत्रीने गेल्या वर्षी आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येप्रकरणी आणखी एकाला अंबोली पोलिसांनी अटक केली. नोकेल रोहे असे त्याचे नाव आहे. यापूर्वी पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.
संजना ऊर्फ सलमा ऊर्फ रजा खातून ही भोजपुरी चित्रपटात काम करत होती. ती जोगेश्वरीच्या हिल पार्कमध्ये राहायची. गेल्या वर्षी संजना ही तिच्या मैत्रिणीसोबत सांताक्रूझ येथील एका हॉटेलमध्ये पार्टीसाठी गेली होती. पार्टीनंतर तेथे चार जण आले. त्याने आपण एनसीबीचे अधिकारी असल्याचे सांगून चौकशीसाठी ताब्यात घेतले. पार्टीत ड्रग्ज घेतल्याने कारवाई होणार अशी त्यांना भीती दाखवली. हे प्रकरण मिटवण्यासाठी 40 लाखांची लाच मागितली. 40 लाख रुपये जास्त असल्याने संजनाने 20 लाख रुपये देण्यास होकार दर्शवला.
पैसे दिल्यावर तिला पुन्हा पैशासाठी धमकी दिली जात होती. त्यामुळे संजना ही मानसिक तणावात होती. बदनामीमुळे ती नैराश्यात गेली. या त्रासाला पंटाळून अभिनेत्रीने आत्महत्या केली होती. हा प्रकार तिच्या मित्राच्या लक्षात आला. त्याने याची माहिती अंबोली पोलिसांना दिली.
संजनाच्या आत्महत्येप्रकरणी अंबोली पोलिसांनी तिच्या मित्राची चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्याच्या चौकशीत नोकेलचे नाव समोर आले होते. तो कल्याण येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कल्याण येथे सापळा रचून नोकेलला अटक केली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.



























































