कर्जत शहरातील स्मशानभूमीच्या इमारतीचे भूमिपूजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कर्जत

कर्जत शहरातील स्मशानभूमी व्यवस्थापक समितीच्या वतीने कर्जत मधील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीच्या  इमारतीचे भूमिपूजन शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरणपूरक असण्याऱ्या या स्मशानभूमीत एकावेळी चार प्रेत रचण्याची व्यवस्था असून याचे वैशिष्ट्ये म्हणजे शेणापासून बनविल्या जाणाऱ्या गोवऱ्यांपासून ही स्मशानभूमी चालणार आहे.

कर्जत स्मशानभूमी व्यवस्थापक समितीच्या वतीने अद्ययावत स्वरूपात स्मशानभूमीची इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी राज्यसभा सदस्य खासदार आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी 20 लाखाचा निधी दिला आहे. त्या निधीमधून नूतनीकरण करण्यात येणाऱ्या स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन खासदार श्रीरंग बारणे यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी माजी आमदार आणि भाजप मतदारसंघ अध्यक्ष देवेंद्र साटम, शिवसेनेचे मतदारसंघ अध्यक्ष संतोष भोईर, तालुका प्रमुख संभाजी जगताप, युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी, भाजपचे शहर अध्यक्ष दीपक बेहेरे, शिवसेनेचे तालुका संघटक राजेश जाधव यांच्यासह कर्जत नगरपालिका विरोधी पक्षनेते भाजपचे अशोक ओसवाल, नगरसेवक संतोष पाटील, मुकेश पाटील, येमुताई विचारे, अरुणा वायकर, शिवसेनेच्या महीला आघाडीच्या कार्यकर्त्या करुणा बडेकर,यांच्यासह अनेक कार्यक्रते उपस्थित होते. ज्यांच्या प्रयत्नाने राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी निधी उपलब्ध करून दिला त्या शिवसेना नगरसेविका सुवर्णा जोशी आणि युवासेना जिल्हा अधिकारी मयूर जोशी यांनी उपस्थिती मान्यवरांचे स्वागत केले, तर शिवसेना शहरप्रमुख भालचंद्र जोशी यांनी प्रास्ताविक केले. कर्जत स्मशानभूमीचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत अनंत जोशी यांचे स्वप्न साकार होत असल्याने कर्जत मधील व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होता.

यावेळी बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी 27 लाख मतदारसंघाच्या मावळ लोकसभा मतदारसंघात आपण साडेचार वर्षात कर्जत शहरात तब्बल 70 लाखाची कामे केली आहेत. मात्र कर्जत शहराशी संबंधित असलेल्या आणि भव्यदिव्य स्वरूप असलेल्या या स्मशानभूमीसाठी गरज पडल्यास आपला खासदार निधी दिला जाईल असे आश्वासन दिले. त्याचवेळी राज्यसरकार आपले असल्याने राज्य सरकारला देखील पत्र देऊन निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बोलताना भाजपचे या जिल्ह्यातील नेते आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांनी कर्जत शहराचा कायापालट होत असताना आपल्या दोन्ही पक्षाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे चांगले काम करीत असलेले खासदार बारणे यांना पुन्हा खासदार होण्यासाठी शिवसेनेच्या मदतीला ताकद मिळावी म्हणून वरिष्ठांनी आपली मते बदलावी आणि जनतेच्या मनात जे आहे जे प्रत्यक्षात आणावे असे जाहीरपणे बोलून दाखवले. तर अनंत जोशी यांच्या वारसा जिवंत ठेवत असलेले मयूर जोशी यांचे कौतुक करून चांगले काम करणाऱ्या च्या पाठीशी आपण कायम असून त्याआड राजकीय मतभेद येणार नाही, असे जाहीर आश्वासन साटम यांनी दिले.