
घोड्यांच्या व्यावसायिक शर्यतींसाठी ओळखले जाणारे महालक्ष्मी रेसकोर्स हे मुंबईतील मध्यवर्ती मोकळे मैदान नेहमीच मुंबईसह देश-परदेशातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. मात्र, आता हेच महालक्ष्मी रेसकोर्स रॅलिंगच्या बाहेरून चालत आणि सायकलची फेरी मारत 24 तास पाहता येणार आहे. मुंबई महापालिकेकडून लवकरच रेसकोर्सच्या रॅलिंग सभोवती 225 एकर जमिनीवर जॉगिंग आणि सायकल ट्रॅक बनवण्यात येणार असून एकही झाड न तोडता पर्यावरणपूरक ट्रॅक बांधण्यात येणार आहे.
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिकेच्या जी/दक्षिण विभागामार्फत महालक्ष्मी रेसकोर्स येथे लवकरच अत्याधुनिक दर्जाचे सायकल ट्रॅक व पदपथ विकसित करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ट्रॅक विकसित करताना एकही झाड न तोडता पर्यावरणपूरक ट्रॅक बांधण्यात येणार आहे. हा सायकल ट्रॅक 4.5 किलोमीटर लांबीचा असून जॉगिंग ट्रॅकची रुंदी 3 मीटर असणार आहे. तसेच या मार्गावर मनोरंजनाच्या सुविधादेखील उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सौर ऊर्जेवर आधारित छत उभारण्यात येणार आहे. जॉगिंग ट्रॅक जवळ बसण्यासाठी आसनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
कोणत्या सुविधा असतील?
– सायकल ट्रॅक 4.5 किलोमीटर
– जॉगिंग ट्रॅकची रुंदी 3 मीटर
– मनोरंजनाच्या सुविधादेखील उपलब्ध.
– सौर ऊर्जेवर आधारित छत.
– जॉगिंग ट्रॅकजवळ बसण्यासाठी आसन व्यवस्था.
– प्रकल्पामध्ये शौचालय, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था.
– हरित बस थांबा, सीसीटीव्ही, बैठक व्यवस्था, खुले वाचनालय, खुली व्यायामशाळा, नावीन्यपूर्ण सुविधा.
धोबीघाट, हाजी अली चौकाचे सुशोभीकरण, नूतनीकरण!
जी-दक्षिण विभागामार्फत महालक्ष्मी रेल्वे स्थानक परिसराचादेखील कायापालट केला जाणार आहे तसेच महालक्ष्मी धोबीघाट, हाजी अली चौक परिसराचे सुशोभीकरण, विस्तारीकरण आणि नूतनीकरण करण्यात येणार आहे.



























































