बिहारच्या मजुराला चोर समजून बेदम मारहाण, हत्येप्रकरणी आठ जणांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळच्या मल्लपुरम येथे एका बिहारी मजुराची बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी 8 जणांना अटक करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालात या मजुरासोबत सामूहिक हिंसाचार करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

ही घटना केरळच्या मलप्पुरम येथे घडली आहे. मलप्पुरम येथील कोंडोट्टी येथे एका ठिकाणी एक माणूस मरणासन्न अवस्थेत असल्याची माहिती मलप्पुरम पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्याला रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या अंगावर जखमा असल्याने पोलिसांना संशय आला. मृत इसमाचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर याची पुष्टी झाली. या माणसाला बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाला होता.

तो सापडला त्या ठिकाणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यांना माहिती मिळाली की तो त्या ठिकाणापासून 300 मीटर लांब असलेल्या एका घरात राहतो. त्याचं नाव राजेश मांची असं असून तो मूळचा बिहारचा आहे आणि सध्या केरळमध्ये मजुरी करत होता. पोलिसांनी या प्रकरणी तपास केल्यानंतर 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोहम्मद अफजल, फाजिल, शराफुद्दीन, महबूब, अब्दुसमद, नसर, हबीब, जैनुल आबिद आणि अयूब अशी या आरोपींची नावं आहेत. यापैकी 8 जणांना अटक करण्यात आली आहे.

हे सगळे आरोपी आधी पोलिसांना तो स्वतःच त्याच्या घराच्या छपरावरून पडल्याचं सांगून दिशाभूल करत होते. पण, पोलिसांनी त्यांच्यासमोर शवविच्छेदन अहवाल ठेवल्यानंतर त्यांनी मारहाण केल्याचं कबूल केलं. दरम्यान, पोलिसांनी या मारहाणीचं चित्रीकरण करणाऱ्या लोकांचा शोध सुरू केला आहे. आरोपींनी धमकावून जे व्हिडीओ डिलीट करायला लावले, त्यांनाही रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे.