रात्री घर साफ केले, दुपारी हातात बेड्या पडल्या, बिहारचा चोरटा नोकर गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कमी पगारात घरकामाला राहायचे. मग संधी साधून घर साफ करायचे अशी मोड्स ऑपरेंडी असलेल्या बिहारच्या नोकराला प्रॉपर्टी सेलच्या पथकाने आज दुपारी शिवडीमध्ये पकडले. मलबार हिल येथील एका उच्चभ्रु कुटुंबाच्या घरात चोरी करून तो बिहारला सटकण्याच्या प्रयत्नात होता.

नेपियन सी रोड येथील एका इमारतीत रिंपल झवेरी या त्यांचे पती आणि सासूसोबत राहतात. 13 तारखेला त्यांनी मदन चौधरी (30) या तरुणाला घरकामासाठी ठेवले होते. रिंपल यांचे पती दमणला व्यवसायानिमित्त ये-जा करत असतात. त्यामुळे रिंपल आणि त्यांची वृद्ध आई याच घरात असतात हे मदनने हेरले. मग दोन दिवसांत संपूर्ण घरात काय काय आहे याची माहिती घेतली. शनिवारी रिंपल या पतीसोबत बाहेर फिरायला तर त्यांची सासू मंदिरात गेल्यानंतर एकट्याच असलेल्या मदनने घरातील 25 लाख किमतीचे सोने-चांदीचे दागिने घेऊन पोबारा केला. रात्री उशिरा घरी आल्यानंतर चोरी झाल्याचे कळताच रिंपल यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलीस मदनचा शोध घ्यायला लागले. दरम्यान, आज दुपारी सीएसटीहून बिहारला पळण्याच्या प्रयत्नात असताना प्रभारी निरीक्षक शशिकांत पवार व त्यांच्या पथकाने शिवडीच्या बरकत अली नाक्यावरच मदनच्या हातात बेड्या ठोकल्या.

मित्राला नडला आणि लटकला
चोरी केल्यानंतर मदन वडाळ्याला त्याच्या गाववाल्याकडे गेला. रात्री त्याच्यासोबत त्याने पार्टी केली. तेव्हा मोठा हात मारल्याचे त्याने सांगताच गाववल्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि मदनने केलेल्या गुह्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. हेच मदनला भारी पडले आणि 12 तासांच्या आत गजाआड झाला. 2014 साली ताडदेव येथे मदनने असाच गुन्हा केला होता. तेव्हाही तो पकडला गेला होता.