आम्ही भाजप नेत्यांना ‘चंपा’, ‘टरबुज्या’ म्हणणार नाही, नाना पटोले यांचे चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे सर्व प्रयत्न विफल झाल्याने भाजप नेते सैरभैर झाले आहेत. त्यांचा तोल ढासळला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला काहीही म्हटले तरी आम्ही भाजप नेत्यांना चंपा किंवा टरबुज्या म्हणणार नाही. ती आमची संस्कृती नाही.’ असे मिश्कील प्रत्युत्तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दिले.

‘केंद्रात जसे एक पप्पू आहेत तसेच महाराष्ट्रातदेखील नाना पटोले हे पप्पू आहेत. ते तोंडाला येईल तसे बोलत असतात.’ अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पटोले यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. त्याचा पटोले यांनी आज पुन्हा समाचार घेतला. चंद्रकांत पाटलांना तेलकट थापा मारून केंद्राचे अपयश आणि मराठा, ओबीसी समाजाच्या फसवणुकीचे पाप झाकता येणार नाही, असे ते म्हणाले.

‘चंद्रकांत पाटील यांनी कितीही टीका केली, कितीही हिणवले तरी आमची हरकत नाही. त्यांच्या टीकेमुळे पेट्रोल, डिझेल व जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होणार असतील, देशाच्या नागरिकांना कोरोना लस मोफत मिळणार असेल, शेतकरीविरोधी कायदे रद्द होणार असतील, मराठा व ओबीसी आरक्षण मिळणार असेल तर त्यांच्या टीकेचे स्वागतच आहे,’ असे पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या अपयशाचेही यावेळी वाभाडे काढले. ‘मोदी सरकार सर्वच आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत, महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. केंद्राच्या काळ्या कायद्यांविरुद्ध राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी गेल्या आठ महिन्यांपासून आंदोलन करत आहेत. कोरोना रोखण्यासाठी सरकारकडे ठोस धोरण नाही. लसीकरणाचा बोजवारा उडाला आहे. गंगेतून वाहणारे मृतदेह जगभरातील माध्यमांनी दाखवल्यामुळे सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.’ असा हल्ला पटोले यांनी चढवला. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि पेट्रोलियममंत्री बदलून मोदींनी या अपयशाची कबुलीच दिली असताना चंद्रकांत पाटलांसारखे बोलघेवडे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका करून ते अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पटोले म्हणाले.