
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने धडपड सुरू केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिेंदेगटाला सोबत घेत भाजप महापालिकेत 150 चा आकडा पार करेल असा दावाही भाजपचे नेते करत आहेत. अगदी भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशीष शेलार यांनी देखील असाच दावा केला आहे. मात्र पुढे त्यांनी केलेल्या एका विधानाने शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं आहे. ‘भाजप आणि शिंदेगट मिळून खरे सेवालय सुरू करू. तसेच, या ‘सेवालया’च्या दरवाजात यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणूस नसेल, असे आशीष शेलार यांनी म्हटले आहे. यामुळे शिंदे गटात गोंधळ उडाला आहे. भाजपच्या मिशन मुंबईमध्ये शिंदे गटाला किती स्थान असा प्रश्न शिंदे गटाला पडला आहे. तसंच महापालिकेत किती जागा मिळणार? कुणाला संधी मिळणार? असा प्रश्न शिंदे गटात गेलेल्यांना पडला आहे.
आशीष शेलार यांनी लोकमतसोबत बोलताना हे विधान केलं होतं. आशीष शेलार यांना प्रतिप्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ‘यशवंत जाधव शिंदेंच्या गटात आहेत. आम्ही प्रवृत्तीच्या विरोधातील लढाई लढत आहोत. यशवंत जाधवांसारख्या प्रवृत्तीचा एकही माणूस ‘सेवालया’च्या दरवाजात नसेल’, असं स्पष्टीकरण दिलं. भाजपच्या नेत्यांनी अशा भूमिका मांडण्यास सुरुवात केल्यानं शिंदे गटाला पुढला मार्ग किती अडचणींचा आहे, याची कल्पना येऊ लागल्याची चर्चा आहे.
यशवंत जाधव हे शिवसेनेचे उपनेते होते. मात्र, शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. याआधी, शिवसेनेने यशवंत जाधव यांना कार्यकर्त्यापासून महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदापर्यंत नेलं होतं. 2017 मध्ये यशवंत जाधव हे तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यामुळे शिवसेनेने त्यांच्यावर सभागृह नेतेपद सोपवलं होतं. त्यानंतर 2018 पासून सलग चार वर्षे ते स्थायी समिती अध्यक्ष होते.































































