शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार करतेय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नरखेड

ज्या पद्धतीने अंशतः तत्वतः अशा शब्दांचा वापर करून ऑनलाइन ढोंग दाखवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. त्याच पद्धतीने आता दुष्काळातही सदृश्य मध्यम अशा शब्दांचा वापर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचे काम केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार करीत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेता धनंजय मुंडे यांनी केला.

ते नरखेड येथे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी आयोजित केलेल्या नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे आयोजक व राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार सुनील शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेता बाबुराव तिडके, विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना मुंडे म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांचे घोटाळे पुराव्यानिशी मी सदनात मांडले. परंतु यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्यापेक्षा सर्वच मंत्र्यांना क्लीन चिट दिली. राज्यातील मंत्र्यांनी तब्बल सोळा हजार कोटी रुपयांचे घोटाळे करून सुद्धा मुख्यमंत्री त्यांना पाठीशी का घालत आहे हे, कळायला मार्ग नाही. पिक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांकडून 20 हजार कोटी वसूल करण्यात आले. परंतु परत देताना केवळ चार हजार कोटी देऊन यातही सोळा हजार कोटीचा घोटाळा झालेला आहे. शेतकरी हा खुला आभाळात आपला व्यवसाय करतो. कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला तोंड देतो. अशा वेळी त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहणे आवश्यक असतांना राज्यातील व केंद्रातील भाजपा सरकार केवळ आकड्यांची जगदी करीत आहेत. आज शेतकरी स्वतःचच सरण रचून आत्महत्या करीत आहे. अशा भीषण परिस्थितीमध्ये त्याला मदत करण्याऐवजी त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम होत. देशाच्या बाहेर हजारो कोटी रुपये घेऊन पळालेल्या पैकी 99 टक्के हे गुजरातचे आहे. यामुळे आता चौकी दारावरच संशय येत आहे. केवळ आणि केवळ जाहिरातबाजी आणि फेकू भाजी करून हे सरकार आपली फसवणूक करीत असल्याचा आरोपही यावेळी धनंजय मुंडे यांनी केला.

यावेळी अनिल देशमुख बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटीची मदत केली असे सांगत आहे. परंतु प्रत्यक्षात ही मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना पन्नास हजार कोटीची मदत दिल्याचा व्हिडिओ अनिल देशमुख यांनी या कार्यक्रमात दाखविला. यावर उपस्थितांनी आम्हाला तर काहीच मिळाले नाही मग हे पैसे गेले कुठे असा सवाल उपस्थित केला. अनिल देशमुख यांनी यावेळी भाषण कमी आणि विरोधात असताना शेतकऱ्यांसाठी सामान्य जनतेसाठी जि मागणी देवेंद्र फडणवीस करीत होते केवळ त्या मागण्या तरी त्यांनी पूर्ण कराव्या? अशी मागणी केली.