
आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मुंबईत आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या कांदिवलीतील कार्यक्रमात वीज पुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. ऐन कार्यक्रमात बत्ती गुल झाल्याने कार्यकर्त्यांची एकच धावपळ उडाली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱयावर आले आहेत. या दौऱयात आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्याच कार्यक्रमाअंतर्गत कांदिवलीमध्ये भाजपच्या पन्ना प्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती. हा कार्यक्रम सुरू असताना अचानक वीज पुरवठा खंडित झाल्ल्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला.
जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत कार्यक्रम सुरू असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने आयोजकांची मोठी पंचाईत झाली. वीज गेल्याने कार्यकर्त्यांनी मोबाईलचे लाईट लावून कार्यक्रम सुरू ठेवला, पण त्यानंतर काही वेळातच वीज पुरवठा पूर्ववत झाला तेव्हा कार्यकर्त्यांचा जीव भांडय़ात पडला.





























































