BJP Leader Shot Dead – भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, घराबाहेर हल्लेखोरांनी एकटं गाठलं अन्…

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि बिहारमधील सर्वात मोठ्या उद्योजकांपैकी एक असणाऱ्या गोपाळ खेमका यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी खेमका यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पाटणा शहरातील गांधी मैदान पोलीस स्थानकापासून काही अंतरावर असणाऱ्या ट्विन टॉवरजवळ शुक्रवारी रात्री ही खळबळजनक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै रोजी रात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. गोपाळ खेमका हे नेहमीप्रमाणे पाटणा क्लबमधून घरी येत होते. हॉटेल पानशजवळील अपार्टमेंटच्या गेटवर ते गाडीतून उतरत असताना दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यामुळे एकच खळबळ उडाली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना जखमी अवस्थेत पाटणामधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले, मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पोलिसांनी एक काडतुस आणि एक मोकळी पुंगळी सापडल्याचे पाटण्याच्या एसपी दिक्षा यांनी ‘एएनआय’शी बोलताना सांगितले. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती डीजीपी विनय कुमार यांनी दिली.