‘ते’ मुख्यमंत्री झाले तरी कागलमध्ये मुश्रीफ-घाटगे संघर्ष अटळ आहे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या मेहरबानीमुळेच हसन मुश्रीफ कोल्हापूरचे पालकमंत्री झाले आहेत. ते मुख्यमंत्री जरी झाले तरी कागलच्या राजकारणात मुश्रीफ आणि घाटगे संघर्ष अटळ आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही गुरू बदलणारे नाही, असा स्पष्ट इशाराच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी आज मुश्रीफ यांना दिला.

दरम्यान, राज्यात सरकारी रुग्णालयात मृत्यूंचे तांडव सुरू असताना त्यावर उपाययोजना करण्याऐवजी शिंदे-फडणवीस सरकारकडून अजित पवार गटासह स्वतःच्या नेत्यांना मंत्रिपदे दिली जात आहेत, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

कागलच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे संघर्ष उफाळून आला आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात ‘ईडी’च्या कारवाईबाबत घाटगे यांच्या सांगण्यावरूनच भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या यांच्याकडून पुढाकार घेतल्याचे दिसून आले आहे. दोन महिन्यांपूर्वी राज्यातील सत्तासंघर्षात नवीन समीकरण निर्माण झाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार मुश्रीफ यांच्यासह शिंदे-फडणवीस सरकारसोबत सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे घाटगे यांना शांत राहावे लागले होते. आता शिंदे गटाचे केसरकर यांना हटवून मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्री केल्याने समरजित घाटगे यांचा संताप उफाळून आला. मुश्रीफ मुख्यमंत्री जरी झाले तरी कागलच्या राजकीय विद्यापीठात यापुढे घाटगे आणि मुश्रीफ संघर्ष अटळच राहील. पालकमंत्री झालेल्या मुश्रीफ यांचा मनमानी कारभार चालणार नाही. भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावे लागेल, असा इशाराच घाटगे यांनी दिला.