बडबडीची स्पर्धा

नीलेश कुलकर्णी

सध्या केंद्रात आणि देशातील २१-२२ राज्यांत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. सत्ताधारी मंडळींनी खरे म्हणजे जबाबदारीने वागायला आणि बोलायला हवे. मात्र गेल्या चार वर्षांत भाजपमधील अनेक वाचाळवीरांनी बेभान आणि बेताल वक्तव्ये करण्याचा विडाच उचलला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा मंडळींना तोंड आवरायला सांगितले असले तरी त्याची दखल फारशी कोणी घेतलेली दिसत नाही.

बेरोजगार तरुणांनी पकोडे तळण्याच्या वक्तव्यावरून खुद्द पंतप्रधान स्वतःच काही महिन्यांपूर्वी अडचणीत आले होते. देशभरात त्यावरून टीकेची झोड  उठली होती. आता केंद्रीय मंत्रिमंडळातील एक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जनतेला ‘लोणची घाला’ असा सल्ला दिला आहे. त्याच्या आधी दुसरे केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह यांनी दुसऱयांदा डार्विनच्या उक्रांती सिद्धांतावरून जाहीर वादग्रस्त वक्तव्य केले. ‘किमान मी तरी माकडांचा वंशज नाही’ असे सत्यपाल सिंह म्हणाले. काही महिन्यांपूर्वी त्यांनी याच पद्धतीने डार्विनचा सिद्धांत नाकारला होता. त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव देव हेदेखील बेताल बडबडीच्या स्पर्धेत दुसऱयांदा उतरले आहेत.

मुले पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवांवरून अलीकडे त्रिपुरामध्ये बऱयाच हिंसक घटना घडल्या त्या तर विप्लव यांनी नाकारल्याच मात्र त्या जोडीला ‘त्रिपुरात सध्या आनंदाची लाट आहे. बघा, माझ्या चेहऱयाकडे. मी खूश दिसतो की नाही?’ असे तारे तोडले. महाभारत काळात इंटरनेट होते, असा जावईशोध लावणारे हेच होते.

तिकडे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची डोप चाचणी करावी’ अशी मागणी करून खळबळ उडवून दिली. इतरही भाजपवाले आपापल्या परीने या बेताल बडबडीच्या स्पर्धेत भाग घेत असतातच. पंतप्रधानांनी अशा सर्व लोकांना तोंड आवरा असे सांगूनही उपयोग झालेला नाही. हे सर्व पक्षाच्या आणि पंतप्रधान व राष्ट्रीय अध्यक्षांच्या नियंत्रणापलीकडे गेल्याने होते आहे की समजून-उमजून हे घडवून जनतेचे लक्ष मूळ समस्यांपासून विचलीत करण्याचा सत्ताधाऱयांचा ‘प्लॅन’ आहे हे समजायला मार्ग नाही. भाजपच्या पक्षश्रेष्ठीना पक्षातील बेलगामांना लगाम घालावाच लागेल. बेताल वक्तव्य करणाऱयांना चाप लावावाच लागेल. हे होऊ शकेल का, हाच खरा प्रश्न आहे.