
हिंदुस्थान-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव चिनी अॅपच्या वापरावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. मात्र मोदी सरकारने बंदी घातलेल्या चिनी अॅपचा वापर ‘गद्दार’ भाजपकडून बिनधास्त सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. महाराष्ट्र भाजपने ‘कॅमस्कॅनर’चा वापर करून प्रसिद्ध केलेले एक पत्रक सर्वांसमोर आणत काँग्रेसने भाजपचे बेगडी राष्ट्रप्रेम उघड केले आहे.
भाजपने ओबीसी मोर्चा प्रदेश कार्य समितीसाठी करण्यात आलेल्या नियुक्तीसंदर्भातील यादी सोमवारी जारी केली. ही यादी कॅमस्कॅनच्या मदतीने स्कॅन करून प्रसार माध्यमांना पाठवण्यात आली. या यादीच्या खाली दिसणाऱया कॅमस्कॅनच्या लोगोवरून ते स्पष्टपणे दिसून येत आहे. केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अॅपचा वापर भाजपकडून राजरोसपणे सुरू असल्याबद्दल काँग्रेसने जाहीर निषेध केला आहे. चिनी कंपन्यांच्या 59 ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. यामध्ये कॅमस्कॅनर या अॅपचाही समावेश आहे. परंतु महाराष्ट्र भाजप आजही हे अॅप वापरत आहे. महाराष्ट्र भाजप हे हिंदुस्थानात नाही का? का त्यांना विशेष सवलत देण्यात आली आहे? असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सावंत यांनी केला आहे.
‘टिकटॉक’ मित्राला मिळावे यासाठी धडपड
भाजपचे चीनबद्दलचे प्रेम हे ओसंडून वाहणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. चिनी अॅप्सवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही निव्वळ धुळफेक आहे. बंदी घातलेले ‘टिकटॉक’ हे आपल्या खास उद्योगपती मित्राला मिळावे यासाठी धडपड कोण करत होते हे लपून राहिलेले नसल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे.
























































