
ज्याप्रमाणे आमची मतं बाद करण्यात आली त्याचप्रमाणे भाजपची मतं बाद करण्यासाठी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. पण निवडणूक आयोगाने भाजपला झुकते माप दिले. अशाप्रकारे केंद्रीय यंत्रणांचा वापर करून तुम्ही निवडणूक जिंकत असाल तर त्याला विजय कसा म्हणता येईल. भाजपने जागा नक्कीच जिंकली असेल पण त्यांचा विजय झाला असे मी मानत नाही, असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
राज्यसभा निवडणुक निकालाची मतमोजणी शनिवारी पहाटे 3 वाजता संपली. यामध्ये महाविकास आघाडीने 3 जागा आणि भाजपने 3 जागा जिंकल्या. महाराष्ट्रातील राज्य सभेच्या 6 जागांसाठी शिवसेनेने 2 , काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रत्येकी एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. भाजपने 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. या निवडणुकीत शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल हे विजयी झाले. तर भाजपचे पीयुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडीक हे या निवडणुकीत विजयी झाले आहेत. राज्यसभा निवडणुकीचा हा निकाल जाहीर झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी राऊत म्हणाले की पहिल्या पसंतीची सर्वाधिक मतं ही संजय पवारांना मिळाली. दुसऱ्या पसंतीच्या आकडेमोडीवर महाडिक यांचा विजय झाला. त्यांनी एक जागा जिंकली परंतु मोठा विजय झाला असे चित्र निर्माण करण्यात आले आहे. मात्र तसे काहीच नाही. काही अपेक्षित मतं आम्हाला पडू शकली नाहीत हे मात्र खरं आहे. दोन चार मतं पुढे मागे झाली. ती मतं कोणती आहेत हे आम्हाला माहित आहे. आमच्या सर्व प्रमुख नेत्यांनी संजय पवारांची जागा जिंकावी यासाठी शर्थ केली. आम्हाला पूर्ण खात्री होती की आम्ही जिंकू आणि आम्ही जवळपास जिंकलोच होतो. राज्यसभा निवडणूक ही किचकट प्रक्रिया आहे. पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांनी भाजपला मतदान केले नाही. काही अपक्ष व इतर पक्षांच्या आमदारांना आमिष दाखवले गेले. काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्यात आला. तर काही ठिकाणी अन्य व्यवहार झाले आणि भाजपचा उमेदवार जिंकला. त्यामुळे भाजपचे अभिनंदन.
यावेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचे तीनही उमेदवार निवडून आल्याने आम्हाला आनंद झाला आहे. आमच्या तिसऱ्या उमेदवाराने शिवसेनेच्या पहिल्या उमेदवारापेक्षा जास्त मतं घेतली आहेत. हा विजय आम्ही आमचे लढवय्ये आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्त टिळक यांना समर्पित करतो. महाविकास आघाडी सरकार अंतर्विरोधाने भरलं आहे. जे स्वतःला महाराष्ट्र, मुंबई आणि मराठी समजतात त्यांना कळालं आहे की महाराष्ट्र म्हणजे १२ कोटी जनता, मुंबई म्हणजे मुंबईकर आणि मराठी म्हणजे आम्ही सगळे जगभरातले मराठी. चंद्रकांत पाटलांचा वाढदिवस असल्याने आम्ही त्यांना कोल्हापूरचा पैलवान विजयी करून भेट स्वरूपात दिला आहे. महाविकास आघाडी आमदारांना घोडे समजून घोडेबाजार म्हणत होती हे आमदारांना आवडलं नाही. ज्यांना ते लागलं त्यांनी आम्हाला मतदान केलं.
























































