
सामना ऑनलाईन, लखनौ
उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथे एका कोनशिलेवर आपले नाव ‘गायब’ करण्यात आल्यामुळे चिडलेल्या एका भाजप खासदाराने आपल्याच पक्षाच्या आमदाराला बुटांनी बडवले. त्यानंतर आमदारानेही मग खासदाराला ठोशे लगावत परतफेड केली. हा प्रकार जिल्हा नियोजन बैठकीत सर्वपक्षीय सदस्यांसमोर घडला. त्यामुळे भाजप खासदार आणि आमदाराच्या या हाणामारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाले.
भाजपचे खासदार शरद त्रिपाठी यांचे नाव एका रस्त्याच्या कोनशिलेवरून नाव गाळण्यात आले होते. त्याचा जाब त्रिपाठी यांनी आमदार राकेश सिंग यांना विचारला. त्यावर ‘तुमचे नाव वगळण्याचा निर्णय माझा आहे,’ असे आमदार सिंग यांनी खासदार त्रिपाठी यांना उलट सुनावले. त्यावरून पारा चढलेल्या त्रिपाठी यांनी सिंग यांना बुटांनी बडवले. तर, सिंग यांनीही मग त्रिपाठींना ठोशे लगावले.






















































