भाजपच्या खासदाराची लोकसभेत शिवीगाळ, नव्या संसद भवनात नवा वाद

भाजपचे खासदार संसदेत किती गलिच्छ भाषा वापरतात याचा प्रत्यय आला आहे. भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी लोकसभेत सडकछाप, गावगुंडाची भाषा वापरत बसपा खासदार दानिश अली यांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. बिधुरी शिवीगाळ करताना भाजप खासदार चक्क हसत होते. बिधुरी यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात खळबळ उडाली. विरोधी पक्षांनी भाजपवर सडकून टीका करीत बिधुरींचे सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी केली आहे. यामुळे मोदी सरकारची पंचाईत झाली असून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

गुरुवारी लोकसभेत चांद्रयान-3 मोहिमेवर चर्चा सुरू होती. त्यावेळी बसपा खासदार दानिश अली यांनी चांद्रयान-3चे श्रेय वैज्ञानिकांचे आहे, पंतप्रधान मोदींचे नाही, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपचे रमेश बिधुरी बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी शिव्यांचा भडीमार सुरू केला. ‘ए xxx  ए उग्रवादी… ए कटुवा… हे दहशतवादी आहेत. हे मुल्ला दहशतवादी आहेत. याचं ऐकू नका, बाहेर फेका याला….’ असे रमेश बिधुरी म्हणत असल्याचे व्हीडिओत दिसत आहेत. बिधुरी बरळत होते तेव्हा डॉ. हर्षवर्धन, रविशंकर प्रसाद हे भाजप नेते हसत होते. हा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपवर टीकेची झोड उठली. सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, भाजपने बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

न्याय न मिळाल्यास सभागृह सोडणार – दानिश अली

लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून या प्रकरणाला प्रीव्हिलेज कमिटीकडे पाठवण्याची मागणी केली आहे. निवडून आलेल्या खासदाराची अशी परिस्थिती असेल तर सामान्य व्यक्तीचे काय? न्याय मिळेल, अध्यक्ष चौकशी करतील, अशी अपेक्षा आहे. अन्यथा मी हे सभागृह सोडण्याचा विचार करीत आहे, असे बसपा खासदार दानिश अली यांनी उद्विग्नपणे म्हटले आहे.

कोणतीही लाज उरली नाही – चतुर्वेदी

शिवसेना खासदार प्रियंका चुतर्वेदी यांनी बिधुरी यांच्या वक्तव्याचा काही भाग ट्विटरवर शेअर करीत भाजप खासदाराकडून गलिच्छ भाषा वापरली जात आहे. त्यांना कोणतीही लाज उरली नाही. लोकसभा अध्यक्ष कारवाई करणार का? असा सवाल चतुर्वेदी यांनी केला आहे.

सदस्यता रद्द करा – जयराम रमेश

संरक्षणमंत्र्यांची माफी पुरेशी नाही. सभागृहात अशा भाषेचा वापर करणे हा बिधुरींचा नाही, तर भाजपचा विचार आहे. रमेश बिधुरींची सदस्यता रद्द करावी ही काँग्रेसची मागणी आहे, असे काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले.

भाजप गुंडागर्दी करीत आहे – आप

भाजप गुंडागर्दी करीत आहे. बिधुरींची भाषा एका गुंडा, माफियाची भाषा आहे. दानिश अलींचा अपमान हा सर्व विरोधी पक्षांचा अपमान आहे. मणिपूरचा मुद्दा उपस्थित केल्याने मला निलंबित करण्यात आले होते. बिधुरींविरुद्ध कारवाई व्हायला हवी, असे आपचे खासदार संजय सिंह म्हणाले.

राहुल गांधींनी घेतली दानीश अलींची भेट

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी बसपाचे खासदार दानीश अली यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दानीश अली यांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर भेटीचे फोटोही शेअर केले आहेत. ‘द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान’ असे या फोटोला कॅप्शन दिले आहे. राहुल गांधी हे माझे मनोधैर्य उंचावण्यासाठी आणि मला पाठिंबा देण्यासाठी माझ्या घरी आले होते. मी एकटा नाही. जे लोकशाहीसोबत उभे आहेत ते माझ्यासोबत उभे आहेत, असे बसपा खासदार दानीश अली म्हणाले.

शिव्या घालणे भाजपची संस्कृती – टीएमसी

मुसलमान, ओबीसी यांना शिव्या घालणे ही भाजपची संस्कृती आहे.  पंतप्रधान मोदींनी मुसलमानांना आपल्याच मायभूमीत भीतीने राहण्यास मजबूर केले आहे, असे तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी म्हटले आहे.

कारवाई करा – मायावती

केवळ माफी नको तर कारवाई हवी, अशी मागणी बसपा अध्यक्षा मायावती यांनी केली आहे.

मी दिलगिरी व्यक्त करतो – राजनाथ सिंह

रमेश बिधुरी यांच्या शब्दांना सभागृहाच्या कार्यवाहीतून हटवले आहे. बिधुरी यांनी जे काही विधान केले आहे त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.