अजब! ‘या’ खासदाराचं वय चार वर्षांत फक्त एकाच वर्षाने वाढलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकांना आता अवघे काही दिवस उरले आहेत. सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी उडाली आहे. दुसरीकडे उमेदवारी कोणाला मिळणार याचाही उहापोह सुरू झाला आहे. या सगळ्यात एक विलक्षण बाब समोर आली आहे. भाजपचे खासदार लक्ष्मी नारायण यादव यांनी त्यांचं वय 74 असल्याचं म्हटलं आहे. गंमत म्हणजे त्यांच्या 2014च्या उमेदवारी अर्जात त्यांचं वय 73 असं नमूद आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये त्यांचं वय कागदोपत्री फक्त एकाच वर्षाने वाढल्याचं दिसत आहे.

या मागच्या कारणाची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. हे कारण आहे भाजपची 75 वर्ष वयाची अट. त्यामुळे अनेक ज्येष्ठ उमेदवार आपलं वय लपवू पाहत आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही उमेदवारी त्यांच्या वयामुळेच अनिश्चित आहे, अशी चर्चा आहे. महाजन येत्या 12 एप्रिल रोजी वयाची 76 वर्षं पूर्ण करत आहोत.

माध्यमांनी यादव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी 2014च्या उमेदवारी अर्जात काय वय लिहिलं आहे, हे आठवत नसल्याचं सांगितलं आहे. त्यांची जन्मतारीख 9 नोव्हेंबर 1944 असल्याचं म्हटलं आहे. पण, त्यांनी आपल्या वयाचा नेमका कोणता आकडा 2014च्या अर्जात भरला होता, त्याबद्दल मात्र त्यांना कोणतीही कल्पना नसल्याचं यादव यांनी सांगितलं आहे.