शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी भाजपला शिवसेनाच हवी, म्हणून त्यांनी हे घडवलं – संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sanjay-raut-speech

शिवसेनेविरुद्ध लढण्यासाठी भाजपला शिवसेनाच हवी, म्हणून त्यांनी हे घडवलं, असा आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी केला. मात्र आमच्याच लोकांचं रक्त आम्हाला संडायचं नाही, म्हणून आम्ही सावध पाऊलं उचलत आहोत, असं ही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

नाशिक येथे बोलताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ‘भाजपनं आता माझ्याविरोधात बोलणं बंद केलं आहे. कारण त्यांना माझ्याविरुद्ध बोलण्यासाठी आता 40 नवे भोंगे मिळाले आहेत’, असा टोलाही त्यांनी लगावला. पुढे ते म्हणाले की आम्ही शिवसेनेसाठी काय केलं आणि काय करतोय हे महाराष्ट्र जाणतो. इतकी वर्षे त्यांनी आमच्यासोबत एकत्र काम केलं आहे. त्यांना आम्ही आजही आपले सहकारी मानतो. भाजपने कितीही प्रयत्न केले तरी आमच्याच लोकांचं रक्त आम्ही सांडवणार नाही. त्यातून आम्ही मार्ग काढू.

बंडखोरी केल्यानंतर त्यांचं पाहिल्या दिवशी कारण होतं की, शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी कारण सांगितलं की आम्हाला वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयात मुख्यमंत्री भेटत नाहीत. त्यांचं तिसरं कारण होतं की राष्ट्रवादी निधी देत नाही. चौथं कारण काहीतरी वेगळं होतं. त्यानंतर ते आता संजय राऊत हे पाचवे कारण पुढे करून बोलत आहेत. म्हणून त्यांनी कोणतेतरी एक कारण ठरवा आणि त्या कारणाशी ठाम रहा. पण या मागे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे भाजपाला शिवसेना संपवायची आहे. कारण जोपर्यंत शिवसेना संपत नाही, तोपर्यंत त्यांचे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे स्वप्न पूर्ण होणार नाही. त्यामुळे आत या 40 बंडखोर आमदारांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी. असे राऊत म्हणाले.

नाशिक हा नेहमीच राजकीयदृष्ट्या चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. संपूर्ण नाशिक हा हिंदुह्रिदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिला आहे. नाशिक मधील सर्व पदाधिकारी, नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे आता कधीही निवडणुकाझाल्या तरी नाशिकमध्ये शिवसेनेचीच सत्ता येईल. कुठे काहीही घडो नाशिक मात्र शिवसेनेसोबतच आहे. सध्या राज्यात जो धुरळा उडालेला आहे. हे कृत्रिम वादळ आहे. या कृत्रिम वादळानंतर शिवसेना खूप जोमाने पुढे गेलेली असेल. नाशिक मध्ये शिवसेना जागच्या जागी आहे. जे फुटून गेले ते आता पुन्हा निवडून विधानसभेत जाणार नाहीत. ते जनतेने आणि शिवसैनिकांनी ठरवलं आहे. आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेबद्दल लोकांना उत्सुकता आहे. त्या यात्रेत जेव्हा नागरिकांचा प्रतिसाद मिळेल तेव्हा शिवसेना जागच्या जागीच आहे हे सर्वांना कळेल, असे यावेळी राऊत म्हणाले.

यावेळी शिंदे गटाचा धनुष्यबाण चिन्हावर दावा केल्याचा प्रश्नावर राऊत म्हणाले की धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचच आहे आणि शिवसेनेचं राहील. हे सरकारच पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेची याचिका न्यायालयात प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांना घ्यायला लावणं हे बेकायदेशीर आहे. राज्यपाल हे घटनेचे पालन करणारे नाहीत हे सगळ्यांचाच म्हणणं आहे. एकतर्फी निर्णय घेतल्यामुळे हे सरकार निर्माण झालं आहे. जी शिवसेना आता पुन्हा उभी राहत आहे. ती खरी शिवसेना आहे. अमुक चिन्ह आमचं तमुक नाव आमचं असा म्हणण्यापेक्षा तुमचं तुम्ही निर्माण करा. असे ते म्हणाले.