महापुरुष आदर्शच, त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोलू नये; पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा आहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महारापुरुषांचा अपमान करण्याची भाजप नेत्यांमध्ये चूरसच लागली आहे. आधी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने भाजप नेत्यांना विरोधी पक्ष व राज्यातील जनतेच्या संतापाचा सामना करावा लागला. अशातच आता माजी मंत्री पंकजा मुंडे यांनीही भाजपला घरचा आहेर दिला आहे. महापुरुष आदर्शच, त्यांच्याबद्दल कुणीही चुकीचं बोलू नये असे विधान पंकजा मुंडे यांनी केले आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने गोपीनाथ गडावरून कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंकजा मुंडे यांनी हे विधान केले.

राज्यात घडलेल्या अप्रिय घटनांबद्दल पंकजा मुंडेंनी उपस्थित हजारो कार्यकर्त्यांसह अर्धा तास मौन पाळले, त्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केले. महापुरुषांना जातीवरून वाटू नका. जातीभेद नष्ट करण्यासाठी ते आयुष्यभर झटले. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी आदर्शच आहेत, त्यांच्याबद्दल चुकीच बोललं जाऊ नये. त्यांना जाती-जातीत विभागण्याचे काम आज होत आहे, हे अतिशय गंभीर व धोकादायक आहे. पुरोगामी महाराष्ट्राचे वेगळे चित्र उभे राहायला हवे आहे. जात, धर्म, पंथ याच्या पलीकडे इथलं राजकारण – समाजकारण गेले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

सामान्य माणसाला आवाज असावा. कोणाचाही आवाज दाबला जाऊ नये. सोशल मीडिया वापरून कोणी नेता बनू शकत नाही. त्यासाठी लोकांच्या मनामध्ये प्रेम निर्माण करावे लागते, असेही त्या म्हणाल्या.

स्वाभिमान गहाण ठेवणार नाही

माझ्या मनात अफाट त्रास असेल, माझ्या वाट्याला दुःख आले तरीदेखील मी स्वाभिमान गहाण ठेवणार नाही. चूक नसलेला सर्वसामान्य व्यक्ती जरी समोर आला असा व्यक्ती माझ्यासमोर आला तरी त्याच्या जोड्यावर डोकं ठेवेन. पण जर कुणी चुकीचा असेल तो माझ्या मनामध्ये कधीच बरोबर होऊ शकत नाही. त्यामुळे कधी राजकारण करत असताना चुकीची गोष्ट करायला लावू नका मी ती करणारही नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले.