खडसे, पंकजा मुंडे यांच्यापाठोपाठ राम शिंदेही नाराजांच्या तंबूत, विखेंमुळे भाजपाची हानी झाली!

1833

विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांकडून पराभवाची कारणमीमांसा जाणून घेण्याचे काम भाजपात सुरू झाले आहे. आमदार आशीष शेलार यांनी आज यासंदर्भात उत्तर महाराष्ट्रातील पराभूत उमेदवारांशी चर्चा केली. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा फायदा होण्याऐवजी त्यांच्याकडून पक्षाची हानी झाली, असा आरोप माजी मंत्री, कर्जत-जामखेड मतदारसंघातील पराभूत उमेदवार राम शिंदे यांनी केला. त्यामुळे या पक्षातील अंतर्गत खदखद पुन्हा चव्हाटय़ावर आली आहे.

भाजपा नेते, आमदार आशीष शेलार यांनी आज नाशिक येथे पराभूत उमेदवारांकडून त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा जाणून घेतली, त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी व राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. प्रदेश पातळीवरून दिलेल्या आदेशानुसार राज्यभर पराभूत उमेदवारांची मते जाणून घेतली जात आहेत, कारणे समजून घेतली जात आहेत, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले. माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी नगर जिल्ह्यात सर्वच्या सर्व 12 जागांवर विजय मिळवून देवू, असे प्रवेश करताना सांगितले होते. मात्र, ते ज्या पक्षात जातात त्याच पक्षाला हानी पोहचवितात, ही परंपरा त्यांनी भाजपात आल्यावरही कायम ठेवली, असा टोला राम शिंदे यांनी हाणला. नगर जिह्यात आमच्या पक्षाचे पाच आमदार होते. विखे आणि मधुकर पिचडांच्या प्रवेशानंतर ही संख्या किमान सात होणे अपेक्षित होती; परंतु ती पाचवरून तीनवर आली. विखेंचा पक्षाला फायदा होण्याऐवजी त्यांच्याकडून हानीच झाली, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘मी पुन्हा येईन’ हे फडणवीसांना पाच वर्षे सतावत राहील
‘मी पुन्हा येईन’ ही कविता देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सादर केली होती. त्यानंतर ही ओळ प्रचाराची टॅगलाइन म्हणून वापरण्यात आली. नंतर घडामोडी घडल्या आणि भाजपला विरोधात बसावे लागले. म्हणूनच आता या टॅगलाइनची खिल्ली उडते आहे. फडणवीस यांना ‘मी पुन्हा येईन’ हे पुढची पाच वर्षे तरी सतावत राहील, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. फडणवीस यांचे 80 तासांचे सरकार हा माझ्यासाठी धक्काच होता असेही त्या म्हणाल्या. अजित पवारांना सोबत घेऊन त्यांनी सरकार बनवले, पण मला बिलकूल आनंद झाला नाही असेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या