
‘‘भाजपाकडून शिवसेना संपवण्याचा डाव सुरू आहे. असे खेळ करत बसण्यापेक्षा आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ. आपले काही चुकले असेल तर जनता आपल्याला घरी बसवेल आणि ते चुकत असतील तर त्यांना घरी बसवेल,’’ असे सांगतानाच, हिंमत असेल तर मध्यावधी घेऊन दाखवा, असे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपाला दिले.
जिल्हाप्रमुखांना स्पष्टच सांगितले, लढायचं असेल तर सोबत रहा
दादर येथील शिवसेना भवनात आयोजित शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत उद्धव ठाकरे बोलत होते. राज्यभरातील जिल्हाप्रमुख या बैठकीला उपस्थित होते. लढायचे असेल तर सोबत रहा, असे परखड आवाहनही त्यांनी या वेळी जिल्हाप्रमुखांना केले. त्यावर सर्व जिल्हाप्रमुखांनी वज्रमूठ उंचावत आपण शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसाठी लढत राहू, असे सांगितले.
सध्या घडत असलेल्या राजकीय घडामोडींबद्दलही उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाष्य केले. विधानसभा मनमानी पद्धतीने चालवली जात असून हा घटनेचा अपमान आहे, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी घटनातज्ञांनाही यासंदर्भात स्पष्टपणे भूमिका मांडण्याची विनंती केली. ते म्हणाले की, ‘‘घटनातज्ञांना माझी विनंती आहे. आपण घटनातज्ञ आहात. सध्या राज्यात जे सुरू आहे ते घटनेला धरून आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेली घटना मोडण्याचा प्रकार सुरू आहे, याबाबत आपली भूमिका स्पष्टपणे मांडा. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्रामध्ये जे काही सुरू आहे त्याबाबत सर्वांना सत्य बोलू द्या,’’ असेही ते म्हणाले.
शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत, उपनेते-खासदार अरविंद सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ, रवींद्र मिर्लेकर आदी उपस्थित होते.
सध्या राज्यात जे सुरू आहे ते घटनेला धरून आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेली घटना मोडण्याचा प्रकार सुरू आहे, हे घटनातज्ञांनी सांगावे.
























































