
काळ्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलनाला बसलेल्या शेतकऱयांना देशाचे पंतप्रधान आंदोलनजीवी, आतंकवादी, नक्षलवादी म्हणाले होते. एसटी आंदोलनाच्या माध्यमातून राज्याच्या जनतेची झालेली हालअपेष्टा, एसटी कामगारांच्या परिवाराला उपाशी ठेवण्याची वेळ आणण्यात पापाचे भागीदार कोण, याचे आत्मपरीक्षण भाजपने करावे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला.
एसटी संपकऱयांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ला हा भ्याड आहे. कालच याचा निषेध केला आहे. भाजपचे पहाटेचे सरकार कोसळल्यानंतर त्यांच्या सुरू असलेल्या थयथयाटाचा हा एक प्रकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या भाजप सरकारच्याच काळात तत्कालीन वित्तमंत्र्यांनी भेटायला आलेल्या एसटी कर्मचाऱयांना सरकारमध्ये सामावून घेता येत नसल्याचे स्पष्ट सांगितले होते. त्याच भाजपच्या नेत्यांनी गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचाऱयांना फूस लावून उन्हा-तान्हात, पावसात बसवले. त्यात त्यांच्या परिवाराचे नुकसान झाले. ही जनवाहिनी थांबविण्याचे पाप भाजपने जाणीवपूर्वक केले होते. यातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न होता.
देवेंद्र फडणवीस हे यापूर्वी राज्याचे गृहमंत्री होते. मात्र, त्यांचा कोणावरच विश्वास नाही. त्यांच्या पक्षातीलच लोकांचे फोन त्यांनी टॅपिंग केल्याचे सर्वांना माहीत आहे. तर, महाराष्ट्रातील एसटी कामगार हे आमचे आहेत. न्यायालयाच्या निकालानंतर त्यांनी उत्सव साजरा केला. त्यावरून ते आपापल्या घरी जातील, असा विश्वास होता. महाराष्ट्रातील एसटी कामगार हे आमचेच लोक आहेत. आपल्याच माणसावर अविश्वास करणे आमचे काम नाही. ते काही आतंकवादी, नक्षलवादी नाहीत. मात्र, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारणाच्या पोळ्या शेकण्याचे पाप भाजप करीत असून, त्याला आता जनताच धडा शिकवेल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.































































