
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठे नेते आहेत, पण 2014 सारखी लाट निर्माण करणे कठीण दिसू लागले आहे, असे विधान 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट निर्माण करणाऱया प्रशांत किशोर यांनी केले आहे.
प्रशांत किशोर आता जनता दल संयुक्तचे (जेडीयू) उपाध्यक्ष आहेत. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वरील मत व्यक्त केले. सद्यस्थितीतही भाजपच आघाडीवर आहे मात्र निवडणुकीचा डाक 10 ते 12 दिवसांमध्येही पलटू शकतो, असेही ते म्हणाले.
आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य करताना प्रशांत किशोर म्हणतात, आज निवडणुका झाल्यास निश्चितच भाजप सर्वात मोठा पक्ष असेल, पण पूर्ण बहुमत मिळवणे अशक्य आहे. गेल्या चार वर्षांचा विचार केल्यास लोकांना दिलेली आश्वासने आणि वास्तव यावर चर्चा हकी आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कोणतीही लाट असणार नाही. कोणत्याही एका पक्षाला निवडणूक जिंकणे शक्य होणार नाही. त्यासाठी आघाडीची गरज असेल, पण त्या आघाडीचा उद्देश असायला हवा.
सोशल मीडियाचे महत्त्व विषद करताना ते म्हणाले, 2014 मध्ये देशांमध्ये चार ते पाच कोटी स्मार्टफोन होते. आता ती संख्या काढून 40 कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मीडिया अत्यंत प्रभावी ठरेल.




























































