
सामना प्रतिनिधी । कल्याण
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा लाचखोर अतिरिक्त आयुक्त संजय घरत याला अखेर कल्याण कोर्टाने जामीन मंजूर केला. ५० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्याला हा जामीन मंजूर झाला. मात्र या जामीन प्रक्रियेची पूर्तता करण्यात विलंब झाला आणि यातच घरत लटकला. याच तांत्रिक कारणाने घरतसह त्याचे लाचखोर सहकारी ललित आमरे आणि भूषण पाटील यांची आजची रात्रही ठाणे सेंट्रल जेलमध्येच जाणार आहे. आता उद्या शनिवारी सकाळचा चहा, नाश्ता आणि भत्ता (जेवण) खाऊनच घरत बाहेर येण्याची शक्यता आहे.
कल्याण कोर्टाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवल्याने बुधवार आणि गुरुवारची रात्र घरतला ठाणे सेंट्रल जेलमध्ये काढावी लागली. सकाळी कोर्टाने घरतसह तिघांचा जामीन अर्ज मजूर केला. मात्र प्रत्यक्षात जामीनाची ऑर्डर हातात पडण्यास सायंकाळचे सहा वाजले. यादरम्यान जेलचे कैदी बराकीत बंद झाल्याने घरत बाहेर येऊ शकला नाही.
कल्याण-डोंबिवली सोडण्यास मनाई
कोर्टाने घरतला जामीन मंजूर केला असला तरी पोलिसांना तपास कामात पूर्ण सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय पोलिसांनी परवानगीशिवाय कल्याण-डोंबिवली सोडण्यास मनाई केली आहे.
नवी ओळख…कैदी नंबर टी ३९५९
ठाणे जेलमध्ये घरत अन्य कैद्यांसोबत जनरल बराकीत होता. त्याची अतिरिक्त आयुक्त ही ओळख पुसली गेली आणि त्याला कैदी नंबर टी ३९५९ ही नवी ओळख मिळाली. बेकायदा आणि नियमबाह्य केलेल्या कर्माचे फळ म्हणून कैदी नंबर टी ३९५९ ही जखम घरतच्या माथ्यावर आयुष्यभर भळभळत राहील.





























































