`बेस्ट’च्या मनमानी महाव्यवस्थापकांना आयुक्त `समज’ देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

आधीच आर्थिक डबघाईला आलेली ‘बेस्ट’ महाव्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे आणखीच खड्ड्यात जात आहे. त्यामुळे ‘बेस्ट’च्या मुजोर महाव्यवस्थापकांच्या मनमानीला चाप लावा अन्यथा त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणू, असा इशारा सोमवारी शिवसेनेने गटनेत्यांच्या बैठकीत दिला. या वेळी आयुक्त अजोय मेहता यांनी आपण स्वत: महाव्यवस्थापकांशी याबाबत चर्चा करू, असे आश्वासन दिले.

‘बेस्ट’ उपक्रमातील माहिती व तंत्रज्ञानाशी संबंधित असणाऱ्या विषयांकरिता अर्नेस्ट अ‍ॅण्ड यंग एल.एल.सी. या कंपनीला महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी निविदा प्रक्रियेचा भंग करून कंत्राट दिल्याचे ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी म्हटले आहे. तिकीटसाठी काम करणाऱ्या ‘मे. ट्रायमॅक्स आयटी इन्फास्ट्रक्चर अ‍ॅण्ड सर्विसेस प्रा. लि.’ कंपनीला दिलेला कालावधी वाढवण्यासाठी पालिका कायद्यानुसार नेमलेल्या उपसमितीने सादर केलेला अहवाल केवळ अमान्यच केला नाही तर मंजूर झालेला ‘बेस्ट’ समितीचा ठराव रद्द करावा, असे पत्रही त्यांनी आयुक्तांना दिल्याचे चेंबूरकर यांनी निदर्शनास आणून दिले. हे करण्याआधी त्यांनी ‘बेस्ट’ समितीला विश्वासात घेतले नाही. त्यामुळे असा मनमानी कारभार करणाऱ्या  महाव्यवस्थापकांना ‘आवरा’ अन्यथा त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणू, असा इशारा पुन्हा एकदा देण्यात आला. या वेळी आयुक्तांनी व्यक्तिश: महाव्यवस्थापकांशी चर्चा करू, असे आश्वासन दिल्याचे चेंबूरकर यांनी सांगितले.

सर्वपक्षीयांचा पाठिंबा

शिवसेनेने ‘बेस्ट’ महाव्यवस्थापकांच्या मुजोरीविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा इशारा नुकत्याच झालेल्या ‘बेस्ट’ समितीच्या बैठकीत दिला होता. याला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिला होता. या पार्श्वभूमीवर झालेल्या गटनेत्यांच्या बैठकीत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महाव्यवस्थापकांच्या मनमानीचा पाढा वाचला. पालिका कायद्यानुसार स्थापन झालेल्या उपसमितीने घेतलेला निर्णय बदलण्यासाठी आयुक्तांनी महाव्यवस्थापकांच्या सांगण्यानुसार राज्याच्या नगरविकास खात्याला पत्रही लिहिले आहे. त्यामुळे महाव्यवस्थापकांच्या मनमानीविरोधात ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्रही दिले आहे.