
मुंबई महानगरपालिकेत 97 नगरसेवकांसह सर्वात मोठा पक्ष आणि समित्यांमध्येही सर्वाधिक सदस्य संख्या असल्याने वैधानिक समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. उद्या 30 सप्टेंबरपासून ही निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. दरवर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या या निवडणुका यावर्षी कोरोनामुळे रखडल्या होत्या.
पालिकेच्या स्थायी, सुधार, शिक्षण आणि ’बेस्ट’ या वैधानिक समित्यांसह आरोग्य, विधी, बाजार-उद्यान, स्थापत्य आणि प्रभाग समित्यांच्या निवडणुका दरवर्षी एप्रिलमध्ये होतात. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे या निवडणुका झालेल्या नाहीत. तसेच या समित्यांच्या बैठकाही झालेल्या नाहीत. मात्र राज्य सरकारने या समित्यांच्या निवडणुका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास परवानगी दिल्याने या निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेत सध्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. यामध्ये 30 सप्टेंबर रोजी शिक्षण आणि स्थायी समिती अध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार असून 1 ऑक्टोबर रोजी ’बेस्ट’ आणि सुधार समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे.
पालिकेतील संख्याबळ
- शिवसेना-97
- भाजप-83
- काँग्रेस-29
- राष्ट्रवादी-8
- सपा-6
- मनसे-1
- एमआयएम-2
- एक नगरसेवक प्रकरण न्यायालयात
- एकूण 227
‘स्थायी’त भाजपचे एक मत कमी
स्थायी समितीत शिवसेनेचे 12, भाजप 10, काँग्रेस 3, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. सुधार समितीत शिवसेना 12, बीजेपी 10, काँग्रेस 2, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी 1 सदस्य आहेत. शिक्षण समितीत शिवसेना 11, भाजप 9, काँग्रेस 4, राष्ट्रवादी आणि सपाचे प्रत्येकी 1 आणि शिवसेना नामनिर्देशित 2 आणि भाजप 1 असे सदस्य आहेत. तर ’बेस्ट’मध्ये शिवसेना 8, भाजप 6, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादीचा एक सदस्य आहे. वरील संख्याबळ पाहता विरोधी पक्ष आणि भाजपने आपले उमेदवार दिले तरी शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.
अशा होणार निवडणुका
5 ऑक्टोबरला शिक्षण आणि स्थायी समितीची, 6 ऑक्टोबरला बेस्ट आणि सुधार समितीची, 7 ऑक्टोबरला स्थापत्य शहर आणि स्थापत्य उपनगर समितीची निवडणूक होणार आहे.
8 ऑक्टोबरला सार्वजनिक आरोग्य आणि बाजार व उद्यान समितीची, 9 ऑक्टोबरला विधी आणि महिला व बालविकास समितीची तर 14 पासून 16 ऑक्टोबरपर्यंत 17 प्रभाग समित्यांची निवडणूक होणार आहे.

























































